• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

ByEditor

May 30, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे उप निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या ४ जून २०२४ रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत माहिती उप निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

मतदानाची टक्केवारी

32 रायगड लोकसभेसाठी 60.51 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 334 तर महिला मतदार 5 लाख 9 हजार 233 असल्याची मााहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. 32 रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 68 हजार 372 मतदार असून 8 लाख 47 हजार 763 महिला तर 8 लाख 20 हजार 605 पुरष आणि 4 तृतीयपंथीय मतदार आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी ७ मे २०२४ रोजी एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीमध्ये एकूण ६०.५१ टक्के एवढे मतदान झाले. सोळा लाख ६८हजार ३७२ मतदार असून त्यापैकी पुरुष मतदार ५ लाख ३३४ तर महिला मतदार ५ लाख ९ हजार २३३ मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

येत्या ४ जून २०२४ रोजी अलिबाग येथील क्रीडा संकुलात असणाऱ्या हॉलमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून या निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. चौदा टेबल मतमोजणीसाठी लावण्यात येणार असून २८ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी वेगळ्या टेबलवर होईल. त्याचप्रमाणे पाच संगणक सुद्धा लावण्यात येणार आहेत.

मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अधिपत्याखाली मतमोजणीसाठी ६५० ते ७०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधित वस्तू आणण्यास मनाई

निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना याबाबत सूचना देणे अनिवार्य आहे. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे निवडणूक विभागाकडून यावेळी सांगितले.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच अधिकृत माध्यम प्रतिनिधींना नेहुली येथील क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नेहुली येथील क्रीडा संकुलच्या गेटमधून प्रवेश दिला जाईल. काही मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपुर्ण रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे आहे

१९१ – पेण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३ लाख ३ हजार ३०८ मतदार असून १ लाख ९५ हजार ६५३ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 1 लाख 2 हजार २५५ पुरुष तर ९३ हजार ३९८महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

१९२ – अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ९७ हजार ३९६ मतदार असून त्यापैकी १ लाख ९८ हजार २८९ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 1 लाख ६२९ पुरुष तर ९७ हजार ६६० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

१९३ – श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ६२हजार २६६ मतदार असून त्यापैकी १ लाख ५५ हजार २५४ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ७५ हजार ९६८ पुरुष तर ७९ हजार २८६महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

१९४ – महाड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ८४हजार ३८६ मतदार असून त्यापैकी १ लाख ६३ हजार ६९६ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ८३ हजार ४१६ पुरुष तर ८० हजार २८० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

२६३ – दापोली विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ८०हजार २६१ मतदार असून त्यापैकी १ लाख ६० हजार ७९८ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ७५ हजार ८१० पुरुष तर ८४ हजार ९८८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

२६४ – गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ४०हजार ७५५ मतदार असून त्यापैकी १ लाख ३५ हजार ८७७ मतदारांनी मतदान केले असून यामध्ये ६२ हजार २५६ पुरुष तर ७३ हजार ६२१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

३२ रायगड लोकसभा मतदारसंघात कुठलाही अनूचित प्रकार न घडता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!