• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोकण पदवीधरमध्ये भाजपाच्या निरंजन डावखरेंकडून अर्ज दाखल

ByEditor

Jun 7, 2024

राज ठाकरेंकडूनही भाजपाला पाठिंब्याची घोषणा

प्रतिनिधी
नवी मुंबई :
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून, मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याच्या महिला-बालविकास मंत्री अदिती तटकरे, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक, संजय केळकर, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, निलेश राणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शेखर निकम, माजी आमदार डॉ. विनय नातू, संदीप नाईक, अनिकेत तटकरे, भाजपाचे विभागीय संघटन मंत्री हेमंत म्हात्रे आदींसह भाजपाचे कोकणातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आमदार डावखरे यांनी आभार मानले. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने पदवीधर मतदारसंघात पाठिंबा देऊन मनसेचा उमेदवार मागे घेतला, याबद्दल श्री. डावखरे यांनी कृतज्ञता व्यक्त केला. कोकणामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन महायुतीच्या उमेदवारीबाबत मार्ग निघून महायुतीची एकत्रित ताकद दिसून येईल, असा विश्वासही आमदार डावखरे यांनी व्यक्त केला. गेल्या १२ वर्षांत कोकणाच्या सर्वोतोपरी विकासासाठी कार्य केले असून, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!