अनंत नारंगीकर
उरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजली या गोदामावर नैनाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (दि. ७) कारवाई केली आहे. यासंदर्भात नैना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल फोनवर माहिती देण्यास चालढकलपणा केला आहे.
उरण तालुक्यातील चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधणे, चिरनेर, मोठी जुई, कळंबुसरे, कोप्रोली, पिरकोण, सारडेसह इतर ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाची बांधकामे उभी राहत आहेत. तसेच अनाधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. सदर बांधकामे ही शासनाच्या नियमानुसार होत नसल्याने सदरची बांधकामे हटविण्यात यावी यासाठी संबंधित गावकरी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था सिडको, तहसील कार्यालय उरण तसेच नैना प्राधिकरण विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल करत आहेत.
मात्र, अशा तक्रार अर्जांची छाननी किंवा दखल संबंधित प्रशासनाचे अधिकारी वर्ग घेत नसल्याने सदर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यात नैना प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाला धर आणि दुसऱ्याला पळ ही नियमावली तयार केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिरनेर विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर यांनी विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील येथील प्रांजली या गोदामावर कारवाई करण्यासंदर्भात तक्रार अर्ज नैना प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केला होता. त्या तक्रार अर्जांची दखल नैना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन शुक्रवारी (दि. ७) आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने थातूरमातूर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात नैना अतिक्रमण विभागाच्या रविंद्र मानकर व प्रताप नलावडे या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल फोनवर बोलण्यास नकार दर्शविला.