विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यात ग्रामीण भागात व उरण शहरातील भागात भटक्या व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या कुत्र्यांमुळे उरणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी शाळेत जाणारी मुले, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, रात्री उशिरा कामावरून घरी परतणारे कर्मचाऱ्यांवर हे मोकाट कुत्रे हल्ले करत असल्याने उरण तालुक्यातील ग्रामीण भागात व उरण शहरात प्रवास करणे आता धोक्याचे झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
उरण नगरपरिषद हद्दीमध्ये नगरपरिषद प्रशासनाने पाहिजे तसे लक्ष न दिल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उरण नगरपरिषद हद्दीतील वीर सावरकर मैदान (लाल मैदान) येथे काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी एका व्यक्तीला हातावर चावून जखमी केले होते. जखमी व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. मात्र, नगरपरिषदेने या महत्त्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने सदर मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उरण नगरपरिषदेने सक्षम यंत्रणा राबवून निर्बीजीकरणासाठी प्रक्रिया राबवावी व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
उरण शहरातील भटक्या कुत्र्यांवर नगरपरिषदेने योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून मोकाट कुत्रे नागरिकांना त्रास देणार नाहीत. एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावला व त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? कुत्र्यांचे निर्बीजिकरण करण्यात यावे. जेणेकरून कुत्र्यांची संख्या वाढणार नाही. उरण नगर परिषदेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी.
-डॉ. फरहान नेरेकर
नागरिक, उरण