• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरने वासराला उडवले; प्राणीमित्रांनी केले वासरावर औषधोपचार

ByEditor

Jun 9, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
मातीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने वासराला उडवले. सदर अपघातात वासरू जखमी झाल्याची माहिती प्राणीमित्रांना कळताच त्यांनी जखमी वासरावर औषधोपचार केले आहेत. सदर अपघात हा रानसई खैरकाठी रस्त्यावर झाला.

महसूल व वन विभागाने उरण तालुक्यातील वनराई परिसरातून माती उत्खनन करण्याचा ठेका हा मातीचोर माफियांना कोणत्याही प्रकारची जागेवर जाऊन पाहणी न करता दिला आहे. त्यामुळे सदर मातीचोर माफिया पैशाच्या जोरावर वनसंपदेचा ऱ्हास करताना दिसत आहेत. त्यात काही मातीचोर माफियांनी आपला मोर्चा हा रानसई, चिर्ले, चिरनेर, विंधणे ग्रामपंचायत हद्दीत वळविला आहे. मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका डंपरने रविवारी (दि. ९) आपली तहानभूक भागविण्यासाठी जाणाऱ्या एका वासराला उडविण्याची घटना घडली. या झालेल्या अपघातात वासरू जखमी झाल्याने डंपर चालकानी पळ काढला आहे. या अपघाताची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य काशिनाथ खारपाटील यांना मिळताच त्यांनी चिरनेर येथील पशु वैद्यकीय कर्मचारी प्रमोद मोकल यांच्याकडून प्रथमोपचार करून घेतले. मात्र, मातीचोर माफिया पैशाच्या जोरावर वनसंपदेचा ऱ्हास करुन माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांच्याही जीवाशी खेळत असतील तर याला जबाबदार कोण? असा सवाल प्राणी पक्षीमित्र महसूल व वन विभागाला विचारत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!