मिलिंद माने
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रिव्ही कंपनीमध्ये रात्रपाळीसाठी पायी चालत जात असलेल्या चार कामगारांना टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रिव्ही कंपनीमध्ये रात्रपाळीसाठी सोलम कोंड येथून पायी निघालेल्या चार कामगारांना MH 48 BM 2623 या भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर टेम्पोने पाठीमागून दिलेल्या धडकेत चार कामगारांपैकी दोन कामगार जागीच मृत्यू पावले तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये या झालेल्या अपघातामध्ये रवींद्र धोंडीबा ढेबे (वय 19) व सचिन शिवाजी ढेबे (वय 18) यांचा जागीच मृत्यू झाला तर संतोष ढेबे (वय 27) व निलेश ढेबे (वय 18) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी टेम्पो चालक चंदन रामकुमार बिन (वय 23 रा. जोनपुर उत्तर प्रदेश) याला महाड औद्योगिक वसाहतीच्या पोलिसांनी अटक केली आहे.