घन:श्याम कडू
उरण : पावसाळा सुरु होण्याआधीच उरण परिसरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले आहे. याबाबत शासकीय यंत्रणा कोणतीच जनजागृती करताना दिसत नाही. गावोगावी अनेक डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याची माहिती उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांनी दिली आहे. याबाबत उरण तालुका मराठी पत्रकार संघाने तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. इटकारे यांच्या निदर्शनास काही महिन्यांपूर्वी आणूनही याची खबरदारी घेतली नसल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याचे दिसते.
तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळू लागल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. खोपटा गावातील बांधपाडा आणि पाटील पाड्यांमध्ये तर अगदी घरोघरी पेशंट सापडू लागले आहेत. मात्र, शासकीय यंत्रणा अजूनही निद्रिस्त असल्याने कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे सांगण्यासाठी गावात आलेला नाही. गावात आतापर्यंत किती रुग्ण झालेत याची माहिती देखील घेण्याची तसदी यंत्रणांनी घेतली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये शासकीय यंत्रणेच्या या अनास्थेबद्दल कामालीचा असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे.
संसद आदर्श गाव म्हणून नोंद असलेल्या उरणच्या खोपटे गावात साधी गटाराची देखील योग्य ती व्यवस्था नाही. गावातून सांडपाणी बाहेर जायला योग्य मार्ग देखील बनू शकलेला नाही. त्यामुळे गटाराचे नियोजन नसल्याने गावात जागोजागी अगदी मुतारी वैगरेचे पाणी त्याच ठिकाणी मुरविले जात आहे. त्यातच गावभर साथ अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरत असल्याने गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाणी टाकीमध्येच तर डेंग्यूचे डास निर्माण झालेले नाहीत ना अशी शंका गावकरी व्यक्त करू लागले आहेत. अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांत असल्याची माहिती खासगी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
याबाबत उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इटकारे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन काही महिन्यांपूर्वी भेट घेतली. त्यावेळी उरणमधील बोगस डॉक्टर, रेसिडेंट इमारतीत कोणतीही परवानगी न घेता दवाखाने असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच याठिकाणी काम करणारा कर्मचारी हा प्रशिक्षित नसल्याची माहिती देऊन याची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. त्यावेळी साथींच्या आजारांचा फैलाव होऊन नये यासाठी खास उपाययोजना आधीच करण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळेच उरणमध्ये डेंग्यू व इतर आजाराच्या साथीचा फैलाव झाला असल्याचा आरोप उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केला आहे.