• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऑनलाइन गंडा घालणारी आंतरराज्य टोळी गजाआड

ByEditor

Jun 16, 2024

२५ बनावट वेबसाइट्सद्वारे २१ लाख ७१ हजार ७२९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक

प्रतिनिधी
नवी मुंबई :
EMC सायबर सेल पनवेल विभागातर्फे शेअर मार्केटमध्ये चांगल्या व अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे इंदोर येथे छाप टाकून बनावट कॉल सेंटर उद्धवस्त करून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

एक्झिक्यूटिव्ह, अकाऊंट डिपार्टमेंट हेड असल्याचे भासवून ऑनलाइन शेअर मार्केटचे ट्रेडिंग करून अधिकच्या नफ्याचे आमिष दाखवून २१ लाख ७१ हजार ७२१ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील संशयित आरोपीत हे बेंगलोर, कर्नाटक, इंदोर, मध्य प्रदेश या राज्यात असल्याचे तांत्रिक तपासावरून निष्पन्न होताच सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणावरून एकूण ८ आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. तसेच ज्या कॉल सेंटरमधून कॉल करून ऑनलाइन फसवणूक केली जात होती त्या इंदोर येथील तुकोगंजमधील ‘अपोलो टॉवर्स’मध्ये ऑनलाइन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरीता कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला.

तपासादरम्यान बनावट वेबसाईट बनविणारा इसम शुभम कुमार व आशिष कुमार प्रसाद आणि कॉल सेंटर चालविणारे आरोपीत यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी खालील एकुण २५ बनावट वेबसाईट बनविल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर कारवाईतील १४ संशयित इसमांकडे सखोल तपास चालू आहे.

लाखोंचा ऐवज जप्त; तपास सुरू
सदर कारवाईदरम्यान एकूण ६० मोबाईल, ४ लॅपटॉप, २० सिमकार्ड, बँक अकाऊंट डाटा, मोबाईल मेलडाटा, चेक बुक्स, डेबिट कार्डस आणि ज्यांची फसवणूक केली आहे, त्यांची माहिती असलेले दस्तऐवज जप्त करण्यात आले आहे. कॉल सेंटरमध्ये एकूण ८ मुली व ५ मुले काम करीत असून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू असून या टोळीने भारतातील विविध राज्यांमध्ये लोकांना फसवले असल्याची शक्यता असून जप्त केलेल्या मुद्देमालासह सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सोशल मीडियावरील कॉल, मेसेज किंवा ओटीपी कोणासोबतही शेअर न करता किंवा आलेल्या लिंकवर क्लिक न करता, तसेच ऑनलाइन शेअरच्या खरेदी विक्रीमधून अधिक नफ्याचे प्रलोभन दाखवणाऱ्यांपासून सावध राहा. भूलथापांना बळी पडू नका आणि मेहनतीने कामावलेल्या पैशांचा अपहार होऊ देऊ नका.

-विवेक पानसरे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ २

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!