अनंत नारंगीकर
उरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मनसेने उरणमध्ये पक्ष बांधणीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच गावोगावी शाखा अध्यक्षपदी निवड प्रक्रिया सुरू केली असून १९० उरण विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून मनसेचे उरण तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत हे इच्छुक आहेत. तरी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सध्या गावोगावी मनसेकडून जनहितार्थ उपक्रम राबविण्याचा संकल्प मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी गावातील लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच तालुक्यातील जनतेच्या, प्रवाशांच्या दुष्टीने महत्वाचा समजला जाणारा खोपटा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लवकरच आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जनहिताच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर हे बोलत होते. यावेळी तालुका सचिव अल्पेश कडू, तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर, विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर, बबन ठाकूर, निशांत ठाकूर या सर्वांच्या माध्यमातून चिरनेर शाखा अध्यक्षपदी किरण भाकुर्लेकर, द्रोणागिरी सेक्टर ४७, ५३ शाखाध्यक्षपदी प्रवीण कांबळी, समीर गंगावे यांची नियुक्ती केल्याचे पत्र तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांच्या हस्ते देण्यात आले.