नागोठणे येथे पदवीधर मतदारांच्या मेळाव्यात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचे आश्वासन
किरण लाड
नागोठणे : कोकणातील सर्व शाळा ग्रीन स्कूल झाल्या पाहिजेत ही माझी संकल्पना आहे. येत्या सहा वर्षात ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी मला यावर्षी आशीर्वाद द्या असे आवाहन कोकण पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी नागोठणे येथे आयोजित केलेल्या पदवीधर मतदार संघाच्या मेळाव्यात केले.
ग्रीन स्कूल संकल्पना ही हरित क्रांती करण्यासारखी आहे. म्हणजे प्रत्येक शाळेवर सोलर पॅनल लावून वीजेच्या बाबतीत शाळा आत्मनिर्भर होऊन विजेचे बील शून्य होणार असून शाळेवरचा आर्थिक भार कमी करुन बचत झालेला निधी शाळेच्या इतर योजनेसाठी वापरता येईल. ही योजना कोकणाच्या पाचही जिल्ह्यात राबवायची आहे. तसेच शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन भाजपचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी रविवार, दि. 23 जून रोजी नागोठणे येथे आयोजित केलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात दिले.

कोकण पदवीधर संघात निरिक्षक म्हणून काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य लोकसभेला तटकरे साहेबांना दिले आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी दुपटीने वाढलेली आहे. आपल्या हातून एकही ओळखीचा मतदार निसटता कामा नये आणि आपला हा हक्काचा उमेदवार निवडून आला पाहिजे. ही जसी भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे त्यापेक्षा एक टक्का जास्त जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या मेळाव्यानिमित्त महिला व बाल कल्याण विकासमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

पेण विधानसभा मतदार संघाची दिशा बदलेली आहे. या मतदार संघात लोकसभेला जो मतदानाचा आलेख ठेवलेला आहे तोच आलेख पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ठेवायचा आहे. या मतदार संघातून पदवीधरांचे 95 टक्के मतदान डावखरे यांना मिळाले पाहिजे कारण समोर कोण उमेदवार आहे हे आपल्याला माहितीच नाही असे उदगार पदवीधरांच्या मेळाव्यात आमदार रविशेठ पाटील यांनी काढले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, रायगड जिल्हा महिला सरचिटणीस गीता पालरेचा, भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा, शिक्षण सेलचे कोकाटे सर यांचेही या मेळाव्यात मार्गदर्शनपर भाषणे झाली. या मेळाव्यासाठी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, भाजपच्या रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा श्रेया कुंटे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रोशन चाफेकर, राष्ट्रवादी काॅंग्रसचे शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, विलास चौलकर, रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग, महिला तालुका अध्यक्षा अपर्णा सुटे, भाजपचे रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, भाजपचे जिल्हा पदाधिकारी मारुती देवरे, भाजपचे रोहा तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रऊफ कडवेकर, प्रल्हाद पारंगे, भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी शेखर गोळे, अहिरे सर, धनराज उमाळे, शहर अध्यक्ष सचिन मोदी, सिराज पानसरे, प्रमोद नागोठणेकर, गणेश घाग, महिला पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पदवीधर मतदार, शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण पदवीधर संघात वाढलेल्या मतदारांचा कौल कोणाला? कोकण पदवीधर मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. यंदा मतदार संघामध्ये सुमारे 2 लाख 23 हजार 222 पदवीधर मतदारांची नोंदणी झालेली आहे. गेल्या वेळीच्या तुलनेत यंदा 1 लाख 20 हजार अधिक मतदारांची नोंदणी झालेली आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे तर महाविकास आघाडीकडून रमेश कीर तसेच इतर पक्षाचे, आघाडीचे एकूण 13 उमेदवार या निवडणुकीत उभे असले तरी मुख्य लढत भाजपचे निरंजन डावखरे व काॅंग्रसचे रमेश कीर यांच्यातच होणार असली तरी वाढलेल्या मतदारांचा कौल कोणाला मिळणार हे येत्या 26 जूनच्या पदवीधराच्या निवडणुकीत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. |