मुंबई : विधानपरिषदेच्या चारपैकी मुंबईतील दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबईतील पदवीधर निवडणुकीत अनिल परब यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या किरण शेलार यांचा पराभव केला. तर मुंबईतील शिक्षक मतदारसंघात ज.मो. अभ्यंकर विजयी झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले माजी मंत्री अनिल परब यांनी किरण शेलार यांचा 26 हजार 12 मतांनी पराभव केला. परब यांना 44 हजार 784 तर शेलार यांना 18 हजार 772 मतं मिळाली. हा विजय शिवसेनेचा , उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आहे, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी विजयानंतर व्यक्त केली. मुंबईत शिवसेना आहे. ही शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं.
या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून परब विजयी झाले.
दरम्यान मुंबईतील शिक्षक मतदारसंघाची निवडणुक चांगलीच चुरशीची झाली. या निवडणुकीत ज.मो. अभ्यंकर यांनी शिक्षक भारतीच्या सुभाष मोरे यांचा पराभव केला.