सलीम शेख
माणगाव : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची एसटी बसला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील अपघात बुधवार, दि. ३ जुलै २०२४ रोजी दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील भागाड गावच्या हद्दीत महाराष्ट्र सिमलेस कंपनीजवळ घडला. या अपघाताची फिर्याद शुभम गणेश गडेकर (वय-२५) एसटी बस चालक रोहा डेपो यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघाताच्या गुन्ह्यातील आरोपी दुचाकी चालक राजीव रंजन सिन्हा (वय-४०, रा. पॉस्को कंपनी विळे भागाड ता. माणगाव) याने त्याच्या ताब्यातील लाल रंगाची ऍक्टिव्हा स्कुटी क्र. एमएच ४६ एव्ही १२७१ हि गाडी पुणे बाजूकडून माणगाव बाजूकडे भरधाव वेगाने चालवीत घेऊन येत असताना विरुद्ध दिशेला येऊन फिर्यादी यांच्या लेनवर येऊन फिर्यादी यांच्या ताब्यातील एसटी बस क्र. एमएच ०६ बीडब्ल्यू ८४३९ या गाडीला धडक बसल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार राजीव रंजन सिन्हा हा जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं.१७३/२०२४ भा.न्या. संहिता कलम २८१, १२५ (ए), १२५ (बी) मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.