• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोकणात मनसेने विधानसभेचे बिगुल वाजवले!

ByEditor

Jul 4, 2024

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ पैकी ७ जागा मनसे लढवणार

मनसे नेते वैभव खेडेकर यांची घोषणा

मिलिंद माने
मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले असून कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील 15 विधानसभा जागांपैकी सात विधानसभा मतदारसंघावर व्ह्यू रचना तयार केली असून महाराष्ट्रात 288 पैकी 200 ते 225 जागा मनसे स्वबळावर लढण्याची तयारी केल्याची मनसेचे कोकणचे सरचिटणीस, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले.

राज्यात लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता मात्र आता त्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचे व त्या पद्धतीने व्युव्हरचना तयार झाली असल्याचे कोकणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आज जाहीर केले. कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा येतात, त्यापैकी सर्वाधिक जागा या रायगड जिल्ह्यात आहेत. त्यातील पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजपा), कर्जत – महेंद्र थोरवे (शिवसेना-शिंदे गट), उरण – महेश बालदी (भाजपा पुरस्कृत अपक्ष), पेण – रवीशेठ पाटील (भाजपा), अलिबाग – महेंद्र दळवी (शिवसेना, शिंदे गट), श्रीवर्धन – आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), महाड – भरत गोगावले (शिवसेना-शिंदे गट) या सात जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाड व श्रीवर्धन या दोन ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी रत्नागिरी – उदय सामंत, उद्योग मंत्री (शिवसेना-शिंदे गट), गुहागर – भास्कर जाधव (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), दापोली – योगेश कदम (शिवसेना-शिंदे गट), चिपळूण- शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट), राजापूर – राजन साळवी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट).

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात कणकवली – नितेश राणे (भारतीय जनता पार्टी), कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), सावंतवाडी – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री (शिवसेना-शिंदे गट).

कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघ येतात, त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली ,गुहागर, चिपळूण-संगमेश्वर व राजापूर या तीन ठिकाणी तर रायगडमध्ये सात विधानसभा मतदारसंघांपैकी महाड व श्रीवर्धन या दोन ठिकाणी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी दोन विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करणार असल्याचे मनसेचे कोकण सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे मनसेचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा हॉटेल शांताई येथे घेण्यात आला होता. त्यावेळी बोलताना वैभव खेडेकर यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी यांच्या नावाची शिफारस मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे केल्याचे सांगितले. त्यावेळी बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये सातत्याने वाटचाल करणारा पक्ष आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी यांनी मागील पाच वर्षात गुहागर विधानसभा मतदारसंघात काम केले असल्याने सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांची शिफारस विधानसभेसाठी केली आहे. तसेच आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी राज्याच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये सांगितल्याचे वैभव खडेकर यांनी सांगितले.

राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत, त्यापैकी २०० ते २२५ जागा मनसेने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे व त्या पद्धतीची व्युव्हरचना तयार झाली असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे नसतील त्या ठिकाणी त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असेही वैभव खेडेकर यांनी सांगितले. गुहागर येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला गुहागर विधानसभाचे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, जिल्हा सचिव संतोष नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!