ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते डायलिसिस आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन
सलीम शेख
माणगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन शनिवार, दि. ६ जुलै रोजी महिला व बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. महायुती सरकारमध्ये आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होईल असे प्रतिपादन यावेळी ना. अदिती तटकरे यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, शिसवेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, महिला जिल्हाप्रमुख नीलिमा घोसाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, क्रिश्ना डायग्नोस्टीक्स कार्यकारी संचालक पल्लवी जैन, वैद्यकीय अधीक्षक अरुणा पोहरे, रा. काँ. युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी, ज्येष्ठ समाजसेवक संजय साबळे, सुमित काळे, शिवसेना शहरप्रमुख सुनील पवार, मयूर शेठ, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. तटकरे पुढे म्हणाल्या की, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे डायलिसिस व सिटीस्कॅन सेंटर सुरू झाले आहे. या रुग्णालयात या आरोग्य सेवा उपलब्ध करीत असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या सेवा शासनामार्फत मोफत देण्यात येणार आहेत. तसेच बाह्यरुग्णांना माफक दरात सवलतीमध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या पैशांची बचत होणार आहे. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात अनेक अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. माणगाव ही रायगड जिल्ह्याची उपराजधानी असून जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे लवकरच माणगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने महायुती सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत. रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. अशा इतर आरोग्य सेवा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही सेवा सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटर या सेवांचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन माणगाव उपजिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.