• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यात विना नंबरप्लेटच्या दुचाकींचा सर्रास वावर!

ByEditor

Jul 20, 2024

वाहन कायद्याला दुचाकीस्वारांकडून तिलांजली

वाहतूक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

शशिकांत मोरे
धाटाव :
सबंध रोहा तालुक्यात आणि शहरातही नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकी वाहनांचा चांगलाच सुळसुळाट आहे. ग्रामीण भागासह शहर परिसरात नंबरप्लेट नसणाऱ्या दुचाकी वाहनांबद्दल संशय व्यक्त केला जात असताना रोह्यात वाहतूक पोलिसांकडून नंबरप्लेट नसणाऱ्या वाहनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का? याबद्दल संशय व्यक्त होताना दिसत आहे.

सार्वजनिक ठिकाणी तर रस्त्यावर दुचाकी वाहनांना नंबरप्लेट नसताना दुचाकींचा सर्रास वापर कशासाठी केला जातो? याचीही सध्या चर्चा रंगू लागली आहे. तर राजरोसपणे ही वाहनं फिरत असल्याने वाहन कायद्याला दुचाकीस्वारांनी मात्र तिलांजली दिली असल्याचेही समोर आले आहे. मात्र वाहतूक पोलीस प्रशासन या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देतील का? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुरळीतपणे होण्यासाठी परिवहन विभाग प्रत्येक स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांना विशिष्ट नंबर देत असतात. परंतु अलीकडे जिल्ह्यात विना नंबरच्या नवीन गाड्यांसोबतच विना नंबरची अनेक जुनी वाहनेही रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. काही आकस्मिक प्रसंग निर्माण झालाच, तर परिस्थिती कशी हाताळावी अशी चिंता नागरिकांना पडत आहे. अनेकजण इतक्या सुसाटपणे वाहन पळवतात की, रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्धांना धडकी भरते. त्यांच्या अतिउत्साही गाडी चालविण्याच्या नादात रस्त्यावरील पादचारी व इतरही वाहनचालकांवर केव्हा, कोणता अप्रिय प्रसंग ओढावेल हे मात्र सांगता येत नाही.

वाहनचालकांचा वेग एवढा अमर्यादित असतो, त्यातही भरीस भर म्हणजे रस्त्यावरून धावणाऱ्या अनेक वाहनांवर नंबर प्लेटच दिसून येत नाही, तर अनेक वाहने त्रोटक नंबरची तर काही वाहनांच्या नंबरप्लेट अर्धवट आकड्यांमध्ये पहावयास मिळतात. अशा विना नंबरच्या वाहनांकडून काही अप्रिय घटना घडल्यास ते वाहन कसे लक्षात ठेवायचे? अशी परिस्थिती सध्या तरी आहे. काहींच्या दुचाकीवर सडलेल्या अवस्थेत नंबरप्लेट असल्याचे पहावयास मिळते तर काहींना तर चार चार वर्ष आपल्या दुचाकीवर नंबर प्लेटच नाही याचा विसर पडल्याचे दिसते.

काहीच कामे नसताना केवळ शाळा, कॉलेजजवळ घिरट्या घालणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या सध्या वाढली आहे. पण हल्ली दुचाकी वाहनांचे नंबर गायब झाल्याचे व त्याजागी ‘अण्णा’, ‘दादा’, ‘हिंदू’, बेडर’ अशी नावे लिहिलेल्या नंबरप्लेट लावलेल्या दिसतात. अनेक दुचाकी नंबरविनाच वापरण्यात येत आहेत. तरुण व अल्पवयीन मुले या दुचाकी वाहनांचा सर्रासपणे वापर करत आहेत. यामुळे एखादा अपघात झाल्यास नंबर नसल्याने त्याची चौकशी करणे पोलीस खात्यास जिकरीचे ठरू शकते. अशा बिगर नंबरप्लेटच्या दुचाकी वाहनांवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करून शिस्त लावण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!