मिलिंद माने
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फटका सहन करावा लागला. याचे कारण भाजपाबरोबर आलेल्या शिंदे गट व अजित पवार गट तसेच मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व ओबीसी समाजातील नाराजी पाहता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल राज्यातील महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणावर विरोधात चाललेला प्रचार पाहता भाजपाने विधानसभा निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसू नये यासाठी महाराष्ट्रात मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून निवडणुका लढवण्याचे ठरवले असून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात घेऊन त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचे ठरविले असून त्याबाबतची घोषणा येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे भाजपाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. त्या भेटीनंतर भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जागी देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होतील असे नाव चर्चिले जात होते. अखेर ते खरे ठरणार असल्याचे दिल्लीच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. भाजपाचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, त्यांना मुदतवाढ देण्यात आली असली तरी भाजपाने नव्या अध्यक्षाच्या शोधासाठी एक समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्रातून भाजपाचे महासचिव विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चिले जात होते, मात्र आरएसएसच्या धोरणानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला प्रथम पसंती दर्शवली असून त्यानुसार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपा व आरएसएसकडून शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह भेट घेतली होती. या भेटीमुळेच देवेंद्र फडणवीस हे लवकरच राज्यातून देशाच्या राजकारणात जातील अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः भाजपाच्या अंतर्गत गोटात चर्चिली जात होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतरचे संकेत खरे ठरत असून येत्या दोन दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात घेऊन राज्यातील भाजपामध्ये असलेली नाराजी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजामध्ये भाजपा पक्षाबद्दल असलेली नाराजी दूर करायची असेल तर मराठा चेहरा राज्याच्या राजकारणात असणे गरजेचे आहे, मात्र मराठा चेहरा हा भाजपाचाच असला पाहिजे तो शिंदे गटातील व अजित पवार गटातील नसावा हेच धोरण ठरवून भाजपाने महासचिव विनोद तावडे यांना राज्याच्या राजकारणात आणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविल्याचे भाजपाकडून चर्चिले जात आहे. येत्या दोन दिवसात विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात तर देवेंद्र फडणवीस यांना देशाच्या राजकारणात आल्याचे चित्र पाहण्यास मिळणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या संकेतामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रस्तावांवर स्वाक्षरी करून पुन्हा संबंधित खात्याकडे पाठवण्याबाबत दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर लगबग चालू केल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून समजते. एकंदरीत भाजपाच्या राष्ट्रीय व राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.