शासनाकडून स्वयंचित कचरा उचलण्याचे मशील नागाव ग्रामपचांयतीला प्रदान
हर्षल मोरे
नागाव : नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ३ किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. दररोज समुद्रकिनारी पर्यटकांची खूप वर्दळ असते व दिवसेदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे किनाऱ्यावरील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागाव समुद्रकिनाऱ्यावरील वाढती पर्यटकांची संख्या लक्षात घेता स्वयंचलित कचरा उचलण्याचे मशीन आवश्यक असेल तर किनाऱ्यावरील स्वच्छता अधिक चांगल्या पध्दतीने करता यावी यासाठी ग्रामपंचायतीने स्वयंचलित कचरा उचलण्याचे मशील मिळण्यासाठी सरपंच हर्षदा मयेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
समुद्रकिनारी वाढत्या पर्यटकांच्या संख्येसोबत कचऱ्याचे प्रमाण सुद्धा जास्त होत आहे. तरी या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. हाताने कचरा उचलण्यास मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीस स्वयंचलीत कचरा उचलण्याचे वाहन यंत्र उपलब्ध व्हावे अशी मागणी जिल्हा परिषदेकडे नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच हर्षदा मयेकर यांनी केली होती. स्वयंचलित यंत्र उपलब्ध झाले तर समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यास सोपे होईल व नागांव समुद्रकिनारा प्लास्टिक मुक्त करण्यास आम्ही यशस्वी ठरू. दिवसेंदिवस वाढत जाणारी समुद्र किनाऱ्याची प्रसिद्धी अधिकाधिक वाढण्यास मदत होईल. सदरील मशीनच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यास ग्रामपंचायत तयार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले होते.
यामुळे नागाव समुद्रकिनाऱ्याला यांत्रिकी पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला होता. किनाऱ्यावरील स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पाम टेक कंपनीची अत्याधुनिक बीच क्लिनींग मशिन नागाव ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देण्यात आले असले तरी या मशीलद्वारे आक्षी व रेवदंडा किनाऱ्यावरीलही स्वच्छता याच मशीनच्या सहाय्याने होणार आहे. या मशिन्स ट्रॅक्टरच्या साह्याने समुद्रकिनारी वापरता येणार असून, किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील कचरा जमा करण्याचे काम केले जाणार आहे. या बीच क्लिनींग मशिनचे हस्तांतरण आज आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र झेळके, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्यासह ग्रामपंचायतींचे सरपंच, विविध विभागांचे अधिकारी, ग्रूप ग्रामपंचायत नागाव सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर उपस्थित होते.
नागाव समुद्रकिनारा अधिक चांगल्यापध्दतीने स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलित कचरा मशीन शासनाकडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मतदारांना निवडणूकीपूर्वी सांगितले होते. त्याची पूर्तता मी केली असून आज मिळालेल्या या मशीचे उद्दघाटन १५ ऑगस्ट रोजी करून या मशीनव्दारे किनारा स्वच्छतेला सुरूवात करणार आहोत. सध्या किनारा कामगार लावून स्वच्छ करीत असलो तरी या मशीनमुळे लहानात लहान कचरासुध्दा किनाऱ्यावरून उचलला जाणार आहे.
-हर्षदा मयेकर,
सरपंच, नागाव ग्रामपंचायत.