प्रतिनिधी
पोयनाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आता राज्यातील जनतेला देव दर्शन घडवून आणणार आहेत. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु झाली असून या योजनेचे शासकीय परिपत्रक (जीआर) निघाला आहे. या योजनेची संपूर्ण माहिती देण्यासाठी पोयनाड येथील मंडळ अधिकारी कार्यालयात ३ ऑगस्ट रोजी अलिबागचे नायब तहसीलदार संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोयनाडचे मंडळअधिकारी महेश निकम व चरीचे मंडळ अधिकारी सूर्यकांत विधाते यांच्या पुढाकाराने पोयनाड व चरी विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेची संपूर्ण माहिती त्यातील अटी, शर्ती, नियम आणि वयासंबंधीची माहिती देण्यात आली. पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. केवळ राज्यातीलच नाही तर परराज्यातील तीर्थस्थळांना जाता येणार आहे.

राज्यातील ६६ तीर्थक्षेत्राचा समावेश
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण ६६ तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सिद्धविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, माऊंट मेरी चर्च, मुंबादेवी, वाळकेश्वर मंदिर, गोराई येथील विश्व विपश्यना पॅगोडा, शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरसह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा समावेश आहे.
परराज्यातील तीर्थक्षेत्रांचा समावेश
राज्यासोबतच इतर राज्यातील अर्थात जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, उत्तरप्रदेश, ओरिसा, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यातील प्रमुख देवस्थानांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. पात्र व्यक्तीची निवड सदर योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करुन पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.
काय आहेत अटी आणि शर्ती
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ६० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार असून प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा ३० हजार कमाल आहे. यामध्ये भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे. लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत अशा कुटुंबांना यामध्ये लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पोयनाड येथील शिबिरासाठी अलिबागचे नायब तहसीलदार संतोष जाधव, पोयनाड मंडळ अधिकारी महेश निकम, चरीचे मंडळ अधिकारी सूर्यकांत विधाते, महसूल सहाय्यक कुणाल चव्हाण, तलाठी दिनेश म्हात्रे, मनोज वाडकर, तलाठी श्रीगाव राजेंद्र खैरनार, तलाठी चरी आर. ए. पाटील, तलाठी पोयनाड हेमंत चांदोरकर, तलाठी पेझारी अनघा म्हात्रे, शहापूर, तलाठी ताडवागळे हेमलता बोबडी, दयानंद सूर्यवशी तलाठी रावेत, देवेंद्र ओव्हाळ कोतवाल पोयनाड, विजय पाटील कोतवाल शहापुर, सचिन नागोठणेकर कोतवाल ताडवागळे, प्रसाद थळे कोतवाल चरी सह विभागातील शंभर पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.