• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विनेश फोगाटला मोठा धक्का । क्रीडा लवादाने याचिका फेटाळली, रौप्य पदकाची आशा संपुष्टात

ByEditor

Aug 14, 2024

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पकमधून भारताला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा लवादाने ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळली आहे. विनेश फोगाटच्या याचिकेवर निर्णय होण्याची वाट प्रत्येक भारतीय पाहत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. विनेश फोगाट हीचं अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचं स्पष्ट झाल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर विनेशनं क्रीडा लवादाकडं धाव घेतली होती. अशातच आता विनेश फोगाटसह भारतीयांची निराशा झाली आहे.

विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीतील सामन्यापूर्वी निलंबित करण्यात आलं होतं. अंतिम फेरीतपूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमनं जास्त नोंदवलं होतं. यामुळं तिला निलंबित करण्यात आलं होतं. विनेश फोगाटनं या प्रकरणी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, इथं देखील विनेश फोगाटच्या पदरी निराशा आलेली आहे. विनेशच्या याचिकेवर 9 ऑगस्टला सुनावणी पार पडली होती.

विनेश फोगाटनं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटातून सहभाग घेतला होता. यापूर्वी ती 53 किलो वजनी गटातून कुस्ती खेळायची. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम पंघाल त्या वजनी गटातून सहभागी झाल्यानं विनेशला वजनी गट बदलायला लागला होता. विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होताना कठोर परिश्रम करुन वजन घटवलं होतं. मात्र, 2017 पासून बदलेल्या नियमांचा विनेशला फटका बसला. यापूर्वी कुस्ती स्पर्धा एका दिवसात पार पडायची. नंतर ती दोन दिवसात पार पडू लागली यामुळं पैलवानांचं वजन अंतिम फेरीपूर्वी देखील मोजलं जावू लागलं.

या बदलाचा फटका विनेश फोगाटला बसला. विनेश फोगाटनं पहिल्या दिवशी तीन सामने खेळले. यावेळी तिचं वजन बरोबर भरलं होतं. तिनं पहिल्याच मॅचमध्ये जपानच्या युई सुसाकीला पराभूत केलं. उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगाटनं यूक्रेनच्या ओकासाना लिवाचला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. यानंतर विनेश फोगाटनं उपांत्य फेरीत क्यूबाच्या वाय. गुझमान लोपेझला पराभूत केलं होतं. या विजयानंतर कोट्यवधी भारतीयांना विनेश फोगाटला रौप्य किंवा सुवर्णपदक मिळणार हे निश्चित झाल्यानं आनंद झाला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळीच विनेश फोगाटला निलंबित केल्याची बातमी समोर आली आणि कोट्यवधी भारतीयांना धक्का बसला. विनेश फोगाटनं सीएएसमध्ये धाव घेतली मात्र, तिथं देखील तिच्या पदरी निराशा आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!