गणेश पवार
कर्जत : कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत रिक्षाने प्रवास करताना ६५ वर्षीय महिला आपल्या जवळील रोख रक्कम व सोन्याची चैन असलेली बॅग रिक्षेत विसरल्या. सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात माहिती दिली असता कर्जत पोलिसांनी जलदगतीने तपास करीत सदर महिलेची बॅग शोधून महिलेला परत केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी कर्जत चार फाटा ते नेरळ रोडवर असलेले मिस्टर वडेवाले हॉटेल ते साबणे डॉक्टर यांचे हॉस्पिटल असा रिक्षेने प्रवास करणाऱ्या मौजे टेंबरे, आंबिवली येथील सुमन शिवाजी निलदे (वय ६५) यांची रोख रक्कम व सोन्याची चैन असलेली हॅन्डबॅग रिक्षामध्ये विसरल्या होत्या. सदरबाबत ६५ वर्षीय सुमन शिवाजी निलदे यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठत माहिती दिली असता, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल वडते,पोलीस हवालदार संतोष साळुंखे, महिला पोलीस हवालदार स्वाती मसुगडे, पोलीस शिपाई रोहित खरात, पोलीस शिपाई संदीप माळी यांनी सदर घटनेबाबत तात्काळ दखल घेत मिस्टर वडेवाले हॉटेल ते साबणे डॉक्टर यांचे हॉस्पिटलपर्यंत संपूर्ण रोडवरील सीसीटीव्ही फुटेज चेक करून, एक्सल चिंचवली येथील रिक्षाचालक चिंतामण तुकाराम बोराडे (वय ४८) याचा शोध घेऊन सदर महिलेचे त्यांचे रिक्षामध्ये विसरलेले रोख रक्कम व सोन्याची चैन असलेली हॅन्डबॅग सुमन शिवाजी निलदे यांना दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी कर्जत पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांच्या ताब्यात दिली. पोलीसांच्या या कामगिरीबद्दल सुमन निलदे यांनी आभार मानले.