अनंत नारंगीकर
उरण : संकष्टी चतुर्थी तथा गौरा गणपती उत्सवाचे औचित्य साधून लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री महागणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी शनिवारी (दि. २१) आपल्या कुटुंबासह गर्दी केली होती. या संकष्टी चतुर्थीचे तथा गौरा उत्सवाचे औचित्य साधून चिरनेर गावातील तरुणांनी एकसंघ होऊन आपआपल्या पाड्यात गौरा गणपतीची स्थापना करून मोठ्या भक्तिभावाने पुजा अर्चा केली.

श्री महागणपती देवस्थान व १९३० सालचा जंगल सत्याग्रह यामुळे चिरनेर गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणेशभक्त मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. शनिवारी (दि. २१) संकष्टी चतुर्थी तथा गौरा उत्सव आल्याने याही वर्षी चिरनेर गावातील तरुणांनी एकसंघ होऊन आपआपल्या पाड्यात गौरा गणपतीची स्थापना केली. त्यामुळे चिरनेर गावात गौरा उत्सवानिमित्ताने गणपती बाप्पाच्या नामाचा गजर गाव परिसर दुमदुमून गेला आहे.
