वैभव कळस
म्हसळा : लोकसभा निवडणुकीत मुश्ताक अंतुले यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खासदार सुनील तटकरे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. या दरम्यान मुश्ताक अंतुले यांना महायुती सरकारमधील महामंडळात काम करण्याची संधी दिली जाईल असे वचन खासदार सुनील तटकरे यांनी दिले होते. :
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार आणि खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू, बॅ. अंतुले यांचे वैचारिक वारसदार, मुस्लिम समाजातील नेते मुश्ताक अंतुले यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह त्यांना नियुक्ती पत्र दिले.
महायुती सरकारने कोकणातील एका प्रमुख मुस्लिम चेहऱ्याला या महामंडळात काम करण्याची संधी दिल्याने समाज बांधवांतून समाधान व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची खा. सुनील तटकरे यांनी भेट घेऊन मुश्ताक अंतुले यांच्या नावाची शिफारस केली. ना. अजित पवार यांच्या समवेत महायुतीतील सर्व नेते गणांनी मुश्ताक अंतुले यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. आज मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी मुश्ताक अंतूले यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. मुश्ताक अंतुले यांना समाजाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने ते माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले साहेबांच्या पाऊलांवर पाऊल ठेऊन नक्कीच अल्पसंख्याक समाजातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास अल्पसंख्याक समाज बांधवांनी व्यक्त केला आहे. मुश्ताक अंतुले यांच्या निवडी बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुनील तटकरे, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदी प्रमुख नेते मंडळी व असंख्य मुस्लिम समाजबांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी शुभेच्छा देताना नाम. आदिती तटकरे यांनी सांगितले कि, राज्यातील एकूण ६ विभाग हे अंतूले यांच्या कार्यक्षेत्रात मोडतात. यापूर्वी अल्पसंख्यांक मंडळासाठी पाच कोटींचा निधी होता मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यात भरघोस वाढ करून तो ५०० कोटी केला. मधल्या कोविडच्या काळात २०१९ नंतर या मंडळाचे पद रिक्त होते, परंतू मुश्ताकभाईंच्या रूपाने हे पद एका शांत, संयमी आणि या पदाला साजेल अश्या व्यक्तीची निवड झाल्यामुळे खरंखूर समाधान वाटत असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. याप्रसंगी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, अंजुमन इस्लाम व्हाईस चेअरमन पद्मश्री डॉ. जहिर काझी, सेक्रेटरी आकिल हाफिज, डॉ. महंमद अंतुले, ॲड. अली अंतुले शेख, फझल हलदे, नाझीम हसवारे, शकुर घनसार, शाहिद उकये, निजाम कागदी, आझाद वतारे, इस्माईल घोले, मुजीब परकार, इकबाल चरफरे, गुलाम चरफरे, सुहेल धनसे आदी मान्यवर रायगड, रत्नगिरी, मुंबई, ठाणे या भागातून शुभेच्छा देण्याकरिता आले होते. मान्यवरांनी मुंबई येथील कार्यक्रमात त्यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.