• डॉ. अंबादास देवमाने नवीन सिव्हील सर्जन तर डॉ. माने सध्या पदस्थापनेविना रहाणार
• अलिबाग सिव्हीलमधील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराची चौकशी करा; संजय सावंत यांची शासनाकडे तक्रार
अमूलकुमार जैन
अलिबाग : अलिबाग येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराबाबत विविध स्तरांवरून तक्रारी सुरू होवून अखेर पोलीस भरती प्रकरणात पैसे घेतल्या प्रकरणी एका लिपीकाला अटक व जिल्हा शल्य चिकित्सक यांना तात्पुरता जामिन मिळाल्यावर तसेच विधीमंडळाच्या सध्या सुरू अधिवेशनात विधीमंडळामध्ये हा विषय गाजू लागल्यानंतर शासनाने अखेर रायगडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांची बदली केली असून त्यांच्या जागी डॉ. अंबादास देवमाने नवीन सिव्हील सर्जन असणार आहेत. डॉ.देवमाने हे ग्रामीण रूग्णालय राजुरा, जि. चंद्रपूर येथे सध्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे डॉ. सुहास माने यांना नवीन पदस्थापना देण्यांत आली नसून त्यांना नंतर पदस्थापना देण्यांत येइल तो पर्यंत त्यांनी उपसंचालक आरोग्य सेवा ठाणे यांच्या कार्यालयात हजर रहायचे आहे असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराबाबत तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक सुहास माने यांच्या बेकायदेशीर कारभाराबाबत त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी शासनाला पत्र पाठवून केली होती. शासनाला लिहीलेल्या पत्रामध्ये सावंत यांनी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराबाबत तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक सुहास माने यांच्या बेकायदेशीर कारभाराबाबत अनेक तक्रारी असून त्याबाबत विविध माध्यमांमध्ये गेली तीन वर्षे अनेक वृत्ते प्रसिध्द झाली असल्याचे नमूद केले आहे. अशा अधिका-याविरूध्द तक्रारी होवूनही शासनाने काहीच कारवाई न केल्याने अखेर काही दिवसांपूर्वी अलिबाग जिल्हा रूग्णालयात पोलीसांनी धाड टाकून एका कर्मचाऱ्याने पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडून खंडणी मागितल्याने त्याला अटक करण्यांत आली होती. या घटनेबाबत स्वतः पोलीस अधिक्षक यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली आहे. अर्थात या मागील सुत्रधाराचा शोध पोलीस घेत असल्याबाबत वृत्ते प्रसिध्द झाली आहेत. विशेष म्हणजे नेमक्या अशा वेळी जिल्हा शल्य चिकीत्सक सुहास माने हे दोन दिवसांच्या किरकोळ रजेवर गेले असल्याची माहिती सावंत यांनी सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयात भेट दिली असता त्यांना समजली.
वास्तविक पहाता जिल्हा रूग्णालयामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद गवई हे असताना त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याकडे कार्यभार देण्याची डॉ. सुहास माने यांची कृती बेकायदेशीर असून याबाबत शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सावंत यांनी केली होती. जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय बीलांच्या पूर्ततेसाठी पैसे घेतले जातात, कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात, कंत्राटी डॉक्टरांच्या वेतनसाठी पैसे घेतले जातात, रूग्णालयातील विविध ठेकेदारांकडून पैसे घेतले जातात अशा प्रकारच्या चर्चा नेहमीच सुरू असतात तसेच तशी वृत्तेही वर्तमानपत्रांमध्ये वारंवार छापून आलेली आहेत असेही सावंत यांनी शासनाला लिहीलेल्या पत्रात नमूद केले होते.
very bad,, जैसी करणी वैसी भरणी