• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रस्त्यांवर वाढलेल्या गवत झुडपांमुळे अपघाताचा धोका!

ByEditor

Sep 24, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, सिडको तसेच विविध आस्थापनाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर गवताचे साम्राज्य वाढल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हे रस्त्यावर वाढलेले गवत झूडपे संबंधित आस्थापनाने ठेकेदाराच्या माध्यमातून काढण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

उरण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेले बहुतांशी रस्ते हे उरणच्या पूर्व विभागाशी जोडलेले आहे. उरण-पनवेल मार्ग चिरनेर-आवरे मार्ग खोपटा-केळवणे या मार्गावरील दोन्ही बाजूला साईटपट्टीवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत झूडपे वाढली आहेत. हे गवत एवढे वाढले आहे की गवताने अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता व्यापला आहे. गवत झूडपे वाढल्याने रस्ता पूर्ण आखूड झाला असल्यामुळे त्या रस्त्यावर दोन वाहने पास होणे मुश्किल झाले आहे. तसेच समोरून येणारे वाहन या वाढलेल्या गवतामुळे दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

द्रोणागिरी नोड परिसरातील बहुतांशी रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या गवतामुळे अपघातही होण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गांवरील गवत झूडपे लवकरात लवकर छाटण्यात यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ठाकूर यांनी केली आहे. यासंदर्भात सिडकोच्या आस्थापनाकडे विचारले असता त्यांनी कामे सुरू असल्याचे सांगितले.

ठेकेदाराला रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढण्यासाठी सांगितले आहे. लवकरच हे काम सुरु केले जाईल.
-नरेश पवार
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!