• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार २०२४’ने सन्मानित

ByEditor

Sep 27, 2024

सलीम शेख
माणगाव :
माणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व उत्तम वक्तृत्त्व शैली असणारे प्रभाकर मारोती मसुरे यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या रायगड शाखेतर्फे राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार २०२४”ने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते व विधिमंडळ पक्षप्रतोद आ. भरत गोगावले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा.कुणबी भवन हॉल, निजामपूर रोड माणगाव याठिकाणी उत्साहात संपन्न झाला.जेष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार २०२४”ने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

अविष्कार फाऊंडेशन इंडिया (कोल्हापूर-महाराष्ट्र राज्य) हि संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात गेली १५ वर्ष कार्यरत आहे. या फाऊंडेशनतर्फे समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शिक्षक, पत्रकार यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींचा जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येतो. माणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे हे गेली अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीने समाजाला भेडसावणारे विविध प्रश्न, समस्या मार्गी लावून पत्रकारितेच्या माध्यमातून बहुजन समाजातील गोरगरीब, सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. ते एक उत्कृष्ट असे वक्ते असून विविध विषयांवर अभ्यासपूर्ण असे व्याख्यान देत असतात. ते समाजात सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत असतात.

सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन झोकून देऊन काम करतात. त्यांच्या या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल अविष्कार या सामाजिक सेवाभावी फाऊंडेशनने घेऊन त्यांचा राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार २०२४” ने सन्मान केला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष पत्रकार संजय पवार, दक्षिण रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काका नवगणे, कोकण विभागाचे संदीप नागे, रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना रायगड अध्यक्ष सोपान चांदे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव, शर्मिला सत्वे, विवा कॉलेजचे प्राचार्य विवेक ढेपे, शिक्षक हेमंत बारटक्के, शिक्षिका अपूर्वा जंगम आदी मान्यवरांसह राज्यभरातून आलेले पुरस्कार्थी, सत्कारमूर्ती, नागरिक, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!