पिंपरी-चिंचवड : महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच पिंपरी- चिंचवड येथून एक धक्कादायक माहिती समोर आली. रोड रोमीयोच्या त्रासाला वैतागून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर,मृत मुलगी १२ वर्षांची असून पिंपरी- चिंडवड येथील भोसरी परिसरात राहत होती. क्षितिज आणि तेजस नेहमीच संबंधित मुलीची येता-जाता छेड काढायचे. सततच्या त्रासाला वैतागून मुलीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.