उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा निर्धार मेळावा संपन्न
अनंत नारंगीकर
उरण : तत्कालीन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात तळमळीने काम केले. त्यामुळे आपण, आपले कुटुंब हे मोकळा श्वास घेत आहोत. २०१४ चा वचपा घेण्यासाठी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी माझा शिवसैनिक सज्ज झाला आहे. त्या शिवसैनिकांच्या व महाआघाडीच्या कृपाशिर्वादाने आमदार म्हणून निवडून येणार आहे. तरी आपल्या समाजाची अवहेलना करणाऱ्या अहंकारी आमदाराला त्याची जागा दाखविण्यासाठी हा मनोहरशेठ भोईर यावेळी ताकदीने निवडणूकीला समोरा जाणार आहे. तरी माझ्या शिवसैनिकांनी उध्दवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) उरण तालुका व शहर बूथप्रमुख आणि बूथ कमिटी सदस्यांचा निर्धार मेळाव्याचे आयोजन बुधवारी (दि. ९) जेएनपीए वसाहत येथील मल्टिपर्पज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना सांगितले की, भाजपची रणनीती ही खोटं बोला पण रेटून बोला अशी आहे. त्यातील उरणचा आमदार हा खोटारडा आहे. उरण विधानसभा मतदारसंघात १०० खाटांचे रुग्णालय आघाडी सरकारमध्ये मंजूर केले आहे. तसेच अनेक जनहिताची कामे मार्गी लावली. या मतदारसंघातील आमदार हा चिरनेर येथील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हजर राहत नाही आणि आपल्या आगरी, कोळी, कराडी समाजाची टिंगल टवाळी करत असेल तर या मतदारसंघात आपल्या जातीचा आमदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकसंघ होऊ या अशी हाक मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थित शिवसैनिकांना करुन पुढील आयुष्य हे जनहितासाठी झोकून देणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख तथा कामगार नेते दिनेश पाटील, संतोष खांडगे, उप जिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, महिला संघटक जिल्हा उपाध्यक्षा ममताताई पाटील, महादेव घरत, वाहतूक संघटना जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी तालुकाप्रमुख बी. एन. डाकी, तालुका संघटक दिपकशेठ भोईर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, महिला तालुकाध्यक्षा भावना कैलास म्हात्रे, तालुका संघटक मनिषा ठाकूर, ज्योती सुरेश म्हात्रे, रंजना तांडेल, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, माजी शहरप्रमुख गणेश शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम कडू, विभागप्रमुख कमलाकर पाटील, एस. के. पुरो, रूपेश पाटील, माजी सभापती तथा सरपंच भास्कर मोकल, सरपंच उर्मिला निनाद नाईक, मधुकर ठाकूर, जगजीवन भोईर, ॲड. हितेश पाटील, के. एल. कोळी, बुथ कमिटीप्रमुख प्रभाकर ठाकूर आदिंसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीचे उमेदवार म्हणून आपले नेते मनोहरशेठ भोईर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडणकविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागा आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
सर्व सामान्य माणसासाठी तळमळीने काम करणारा नेता कोण असेल तर तो मनोहरशेठ भोईर हे आहेत. त्यामुळे आघाडीचे उमेदवार हे मनोहरशेठ भोईर हेच असणार आहेत. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मनोहरशेठ भोईर यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागा असे आवाहन माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांनी शिवसैनिकांना निर्धार मेळाव्याचे औचित्य साधून केले.