मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय.
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत आर्थिक लाभ पुरवला जात आहे. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळतोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत.
म्हणजेच या योजनेचा ज्या महिलांना जुलैपासून लाभ मिळत आहे त्यांना आत्तापर्यंत 7500 मिळाले आहेत. ऐन दिवाळीच्या काळात हा आर्थिक लाभ मिळाला असल्याने लाडक्या बहिणीची दिवाळी गोड झाली आहे. पण अशातच गत काही दिवसांपासून सरकार लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस म्हणून आणखी काही पैसे देणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याकाठी दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त आणखी 5,500 रुपयांपर्यंतचा दिवाळी बोनस लाडक्या बहिणींना मिळणार अशा बातम्या सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. काही महिलांना 3000 रुपये आणि काही निवडक महिलांना तसेच मुलींना 5500 रुपये दिवाळी बोनस म्हणून मिळणार असे म्हटले जात होते.
यामुळे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून हा दिवाळी बोनस आता कधी जमा होणार हा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आता याच संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून मोठी माहिती हाती आली आहे.
दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी साधलेल्या संवादानुसार, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. बोनसबाबतचे वृत्त खोटं असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
तसंच, काही दिवासंपूर्वी मोबाईल गिफ्ट मिळणार असल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र, याबाबतही कोणताच शासन निर्णय झालेला नाही. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अनेक महिलांची फसवणूक होऊ शकते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनासंदर्भात अधिकृत माहिती घेण्याकरता सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच खातरजमा करून घ्या. अन्यथा तुमचा आर्थिक फसवणूक होऊ शकते.