पुणे : राज्यात निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. यामुळे दिवाळीच्या आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सर्वत्र नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये काळा पैसा व आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड सापडत आहेत. अशातच आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले गेले आहे. तसेच हिंगोली शहरात नाकाबंदी दरम्यान बस स्थानक परिसरात पोलिसांना एका इनोवा कारमध्ये १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड सापडली आहे.
पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटींची रोकड जप्त केल्यानंतर आज (शुक्रवार) सकाळा ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले आहे. पुणे-सातारा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सोन्याचे दागिने सापडले. हे सोनं नेमकं आलं कुठून, कुठे जात होतं? कोणाचं होतं याचा तपास केला जात आहे.
टेम्पोमध्ये १३८ कोटी रुपये किंमतीचे सोने सापडले आहे. हा टेम्पो एका खाजगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील एका व्यापाऱ्याकडे जात होतं, अशी माहिती समोर आली आहे. याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी यासंदर्भात सर्व माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. सध्या हा टेम्पो पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात नेण्यात आलेला आहे.
हिंगोलीत १ कोटींची रोकड जप्त –
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातही पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. नाकाबंदीदरम्यान एका कारमधून पोलिसांनी १ कोटी ४० लाखाची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी रोकड जप्त करून तपास करू केला असून प्राथमिक तपासात ही रोकड एका बँकेची असल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोली शहरात बस स्थानक परिसरात पोलिसांना एका इनोवा कारमध्ये १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड सापडली आहे. ही रोकड पोलिसांनी जप्त केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड कशी आली, याचा तपास केला जात आहे.