बारामती : दिपावली पाडव्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आलो आहे. परंतु कोणी जाणिवपूर्वक त्यांना व्हीलन ठरवत असेल तर मग मला तारखेनुसार काही गोष्टी समोर आणाव्या लागतील असा इशारा खासदार सुनील तटकरे यांनी दिला. त्यावेळी जयंत पाटील यांना काहीसुद्धा माहित नव्हते. काटेवाडीत अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तटकरे म्हणाले, २०१४ साली भाजपला पाठिंबा जाहीर केला गेला. त्यावेळी जयंत पाटील यांना यातील काही माहिती सुद्धा नव्हते. ते त्यावेळी इथे नव्हते. पण पाठिंबा जाहीर केला ही गोष्ट तर खरी आहे. नेहमी अजित पवार यांना व्हीलन करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मला काही गोष्टी तारखेनुसार सांगाव्या लागतील. पण आज पाडव्याचा शुभदिन असल्याने मी बोलत नाही.
मी अजित पवार यांची भेट घेतली. जनतेच्यावतीने शुभेच्छा दिल्या. त्यांची भेट प्रेरणादायी असते. शरद पवार यांना आम्ही सर्वांनी दैवत मानले आहे. त्यांच्याबाबत काय बोलणार असे तटकरे म्हणाले. लाडकी बहिण योजना यशस्वी झाली असून सरकारने यात काही वेगळे केलेले नाही. तर कर्तव्य पूर्ण केल्याचे ते म्हणाले. शिवाय महागाई यूपीए सरकारच्या काळात वाढलेली असल्याचे ते म्हणाले.
पुन्हा महायुतीचेच सरकारच येईल
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार चांगल्या मतांनी विजयी होतील. पवार कुटुंबावर बोलणार नाही. मोठे कुटुंब आहे. उद्याही भाऊबीज होवू शकते. आम्ही विनंती केल्यानुसार अजित पवार यांनी पाडवा कार्यक्रम घेतला. निवडणूकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होईल, दुसरे कोणतेही चित्र दिसणार नाही, असे ते म्हणाले. अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य नैराश्येपोटी असावे, महिलांसाठी अशी भाषा योग्य नाही असे ते म्हणाले.