देवेंद्र दरेकर
पोलादपूर : मागील काही तासात पोलादपूर तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गावच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओढ्याच्या मागून भुस्खलन झाले असल्याने घरे व गोठा याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. या वाडीवरील 25 घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

तालुक्यातील नानेघोळ गावाचे पोलीस पाटील यांनी नानेघोळ गावच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओढ्याच्या मागून भुस्खलन झाले असल्याची माहिती आपत्ती निवारण कार्यालयात दिल्यानंतर रात्रीच्यावेळी उपस्थित असणारे पोलीस अधिकारी युवराज म्हसकर यांच्यासह कर्मचारी तसेच निवासी नायब तहसिलदार श्री. पाटील, तलाठी वैराले यांनी घटनास्थळी धाव घेतली असता गावच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओढ्याच्या मागून भुस्खलन झाले असून सदर भुस्खलनामध्ये गावातील ज्ञानोबा गोविंद जाधव, चंद्रकांत गोविंद जाधव, दत्ताराम गोविंद जाधव यांचे घर जमिनदोस्त झाले असून घरामध्ये कोणीही वास्तव्यास नव्हते, तसेच पांडुरंग रायबा रानोके यांचा गुरांचा गोठा जमिनदोस्त झाला आहे व सहदेव पांडुरंग दाभेकर यांचे घराचे नुकसान झाले आहे. भुस्खलन झाल्यावर सुदैवाने जीवितहानी झाली नसून गोठ्यातील ४ जनावरांना पोलीस व आपत्ती निवारणच्या सहकार्याने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
नानेघोळ येथील वरची वाडी येथे एकूण २५ घरे असून त्यातील सर्व रहिवासी यांना पोलिस पाटील यांचे घरासमोर असलेले रुपेश जंगम यांचे घरी सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे.