सलीम शेख
माणगाव : माणगावपासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कशेणे गावच्या हद्दीत न्यू सुग्राम हॉटेलजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला. सदरील घटना रविवार, दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद चेतन तानाजी सावरटकर (वय – ३४, रा. डोंबिवली पूर्व) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद देणारे चेतन तानाजी सावरटकर व मयत राजेश नथुराम पिरदनकर (वय -४२, रा. कशेणे, ता. माणगाव) हे दोघे शतपावली करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग रस्त्याच्याकडेने चालत असताना मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे जाणारी सफेद रंगाची कार (प्रकार माहित नाही, नंबर माहित नाही) यावरील चालकाने त्याचे ताब्यातील कार हि अतिवेगाने चालवून मयत माणगावजवळील कशेणे गावच्या हद्दीत न्यू सुग्राम हॉटेलजवळ मयत राजेश पिरदनकर यांना पाठीमागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात मयत राजेश पिरदनकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू होऊन वाहनावरील चालक पळून गेला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं.२७०/२०२४ भा.न्या. सं. कलम १०६(१),२८१ ,१२५ अ,१२५ ब मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ प्रमाणे करण्यात येऊन कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार हे करीत आहेत.