• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

निवडणुकीच्या रणधुमाळीत जसखार गावात आढळले चिकन गुनियाचे २१ रुग्ण, रहिवासी भयभीत

ByEditor

Nov 16, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील जसखार ही सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीए बंदर, इतर प्रकल्प यांच्या माध्यमातून करोडोंच्या घरात दरवर्षी मालमत्ता कर मिळत आहे. मात्र भ्रष्टाचारानी पोखरलेल्या जसखार ग्रामपंचायतीला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. गावातील अस्वच्छता, डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे चिकन गुनियाचे २१ रुग्ण गावात आढळून आल्याने रहिवासी भयभीत झाले असून आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली आहे.

चिकन गुनिया या आजाराचे नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. कारण, चिकन गुनिया झाल्यावर त्याचा त्रास एक ते दोन वर्ष होतो असे म्हणतात. चिकन गुनियामध्ये अंगदुखी आणि भयंकर तापामुळे माणूस हैराण होतो. चिकन गुनिया हा विषाणूजन्य आजार असला तरी तो संसर्गजन्य नक्कीच नाही. या आजारापासून सुटका हवी असेल तर न घाबरता याचा सामना हा आपले परिसर स्वच्छ ठेऊन करायला हवा. असे शासनस्तरावरुन वारंवार सांगितले जाते. मात्र करोडोंचे उत्पन्न मिळणारी जसखार ग्रामपंचायत ही रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अकार्यक्षम ठरली आहे. त्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असताना जसखार ग्रामपंचायत हद्दीतील २१ रहिवाशांना चिकन गुनिया सारख्या आजाराने ग्रासले आहे. सदर रुग्ण हे खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याने गावातील इतर रहिवाशी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.

जसखार ग्रामपंचायत हद्दीत चिकन गुनियाचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच गावात चिकन गुनिया सारख्या आजाराचे रुग्ण आढळून येऊ नयेत यासाठी तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर, अधिकारी, परिचारिका, कर्मचारी हे सातत्याने रहिवाशांच्या संपर्कात आहेत. परंतु रहिवाशांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टर उपचार करुन घेण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावे अशा सुचनाही रहिवाशांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
-डॉ. राजेंद्र इटकरे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!