विश्वास निकम
कोलाड : शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी स. ७.४५ वा. मौजे वरसगांव येथे चहा टपरीच्या मागे सामान ठेवण्याच्या खोलीमध्ये एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे वरसगावसह कोलाड आंबेवाडी नाक्यावर सकाळी एकच खळबळ उडाली.
रोहा तालुक्यातील वरसगाव भिरा फाट्यावर चहाचा व्यवसाय तसेच टपरी चालक सहदेव कांदलगावकर यांनी आपल्यावर झालेल्या कर्जापोटी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सदरच्या परीसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती घेत तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सहदेव प्रभाकर कांदळगावकर (वय ५४) या मयत झालेल्या इसम यांनी चहाची टपरी चालविण्याकरिता कर्ज घेतले होते. कर्ज फेडू न शकल्यामुळे मयत सहदेव यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेतले होते. उपचारासाठी त्याला रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत कोलाड पोलिस ठाण्यात मृत्यू रजिस्टर नं. १५/२०२४ BNSS १९४ प्रमाणे नोंद झाली असुन याविषयी कोलाड सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एन. एन चौधरी तसेच पोहवा एम. डी. पाटील अधिक तपास करीत आहेत.