वार्ताहर
खोपोली : रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर टेम्पोने बसला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर बस २० फूट दरीस कोसळली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी गर्दी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस सांगोल्याहून मुंबईला जात होती. दरम्यान, बस रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पोहोचली असता पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने बसला जोरदार धडक दिली. या घडकेनंतर बस रेलिंगवर आदळली आणि दरीत कोसळली. या घटनेत बसमधील १४ जण जखमी झाले.जखमींना खोपोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती महामार्ग सुरक्षा गस्ती पथकाने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या घटनेत टेम्पोमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पनवेलजवळील कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.