मुंबई : कुर्ला परिसरामध्ये सोमवारी संध्याकाळी बेस्ट बस भीषण अपघात झाला. या अपघाताने अख्खी मुंबई हादरली. या भीषण अपघातात तब्बल सात जणांचा मृत्यू झाला आणि ४८ लोकं गंभीर जखमी झाली असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची घटना ताजी असताना बेस्ट प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. अशात मनसेने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये बेस्ट बसचे कर्मचारी किती गंभीर आहेत याची प्रचीती येते. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेताना मनसेकडून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी बेस्ट बस चालकाचा वाईन शॉपवरुन दारू घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. बेस्टचा बस चालकाने गाडी थांबवली आणि तो दारू घ्यायला वाईन शॉपवर गेला. तिथून दारू घेऊन तो परत आला आणि पुन्हा चालकाच्या सीटवर बसला. महत्त्वाचं म्हणजे त्या बसमध्ये प्रवासी बसल्याचं दिसतंय. बेस्ट बस चालकांवर बेस्ट प्रशासनाचं नियंत्रण आहे का? असा प्रश्न मनसेकडून करण्यात आला आहे. त्यासोबत वाईन शॉपवर बेस्ट बस थांबवून दारू घेणाऱ्या बस चालकाचा विरोधात काय कारवाई करणार असा सवालही मनसेने केला आहे.
मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यात सात जणांचा मृत्यू झालाय तर ४८ जण जखमी झालेत. या अपघाताला नेमक जबाबदार कोण, ड्रायव्हर की बेस्ट प्रशासन असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुर्ल्याच्या गजबजलेल्या भागात बेदरकारपणे बस घुसविणाऱ्या चालकाला इलेक्ट्रिकवरच्या १२ मीटर लांबीच्या बसगाडीवर अवघे तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन रुजू केले होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ‘बेस्ट’च्या नियमित बसचालकांना दीड महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यानंतरच कर्तव्यावर रुजू करून घेतले जात असताना भाडेतत्त्वावर काम करणाऱ्या बसचालकाला मिनिबसच्या अनुभवानंतर अत्यंत तुटपुंज्या अनुभवावर मोठ्या बसचे स्टिअरिंग हाती सोपविण्यात आले होते. भीषण अपघातामुळे हा गंभीर मुद्दा पुढे आला आहे.