• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

करंजा मच्छीमार बंदरानजीक अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य

ByEditor

Dec 17, 2024

घन:श्याम कडू
उरण :
शासनाने तालुक्यातील करंजा गावाजवळ अत्याधुनिक मच्छीमार बंदराची उभारणी केली आहे. या बंदरानजीक असलेल्या मेरी टाईम बोर्डच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य उभे राहिले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

उरण तालुक्यातील करंजा गावाजवळच कोट्यवधी रुपये खर्च करून मच्छीमार बांधवांसाठी बंदर उभारले आहे. बंदर उभारले खरे मात्र त्यासाठी लागणाऱ्या इतर सोयीसुविधांकडे शासनाने लक्ष दिल्याचे दिसत नाही. त्यामध्ये प्रामुख्याने डिझेल पंप, बर्फाची फॅक्टरी, मच्छि साठवणूक केंद्र यांचा प्रामुख्याने अभाव जाणवत आहे. तसेच अरुंद रस्ता व छोटी मोठी दुकाने यासाठी जागा उपलब्ध नाही.

बंदराजवळच मेरी टाईम बोर्डची जागा आहे. या जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनेकांनी पक्के बांधकाम करून त्यामध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू केले आहेत. याबाबत उरणमधील पत्रकारांनी मेरी टाईम बोर्डाचे करंजा येथील निरीक्षक अ. ल. शिंदे यांची भेट घेऊन तक्रार केली असता, त्यांनी आपण याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी व अधिकारी वर्गाकडे लेखी तक्रार करून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त केली. यावरून अशा अनधिकृत बांधकामाला आर्थिक साटेलोट्यातून मूक संमती असल्याची चर्चा मच्छीमार बांधवात सुरू आहे. तरी अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मेरी टाईम बोर्डच्या जागेवर अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य उभे राहिले आहे. आपण याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून लेखी तक्रार करून कोणतीच कार्यवाही होत नाही.
-अ. ल. शिंदे,
बंदर निरिक्षक करंजा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!