• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वय चोरणाऱ्या खेळाडूंवर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडक कारवाई करणार

ByEditor

Dec 17, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
गेल्या काही वर्षात इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल,भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, प्रत्येक राज्यातील क्रिकेट असोसिएशन ते जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एका विशिष्ठ तारखेनुसार वयाची अट असते व बोन टेस्टची (हाडांची चाचणी) पूर्तता करावी लागते. मात्र असे बरेचदा आढळून येते की, ज्या वयोगटाची स्पर्धा असते त्यापेक्षा जास्ती वयाचे खेळाडू आपल्या वयाचे खोटे दाखले व पुरावे तंतोतंत तयार करून स्पर्धेत सहभागी होत असतात.

खेळाडूंची बनवाबनवी, काही क्रिकेटपटू आपल्या जन्मतारखेची खोटी तारीख तयार करून आपले वय कमी दाखवून कागदपत्रे तंतोतंत तयार करून खेळतात, तर काही खोटे आधारकार्ड तयार करून त्यात नाव आणि वय बदलून आपल्या वयाचा व रहिवासी असल्याचा पुरावा तयार करून खेळतात. एवढ्यावरच न थांबता क्रिकेट स्कोरिंग ॲपमध्ये आपल्या खऱ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून त्या-त्या क्रिकेट असोसिएशनला हुबेहूब फसवतात. बनावट सादर केलेले कागदपत्रांचे पुरावे अगदी तंतोतंत खरे वाटावे असे तयार केल्याने प्रथमदर्शनी त्यावर विश्वास ठेवावा लागतो. पण नंतर त्याची सखोल पडताळणी केल्यावर कागदपत्रे खोटी तयार केली असल्याचे निदर्शनास येते. कहर म्हणजे काही खेळाडू आपल्या लहान भावाच्या नावाने कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून त्याच्या नावाने खेळत आहेत. खोटे जन्माचे दाखले, शाळेचे बनावट बोनाफाईड, वय आणि रहिवासी पत्ता बदलून तयार केलेले आधारकार्ड करण्याचे प्रमाण देशभर वाढत चालले आहे. वय चोरणारे खेळाडू स्वतःला भविष्यात स्टार क्रिकेटर बनवण्याच्या नादात आपल्यापेक्षा लहान असलेल्या खेळाडूंवर अन्याय करीत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसते. काहीवेळा तर बॉन टेस्टचा रिपोर्ट सुद्धा बनावट तयार केलेले किस्से आढळुन आले आहेत.

ह्याला आळा बसावा म्हणून आयसीसी, बीसीसीआय, एमसीएपासून ते प्रत्येक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या खेळाडूंवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होतांना दिसते. रायगड जिल्हा सुद्धा याला अपवाद नाही. रायगड जिल्ह्यातील काही अकॅडमी आणि क्लबच्या खेळाडूंनी आपल्या वयाचे व रायगड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे खोटे दाखले व पुरावे तयार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याला आळा बसावा व संबंधित लोकांवर कडक कारवाई व्हावी यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट अससिएशनच्या कार्यकारणी मंडळाची सभा १० डिसेंबर रोजी पेण येथे संपन्न झाली. त्यामध्ये खोटे वयाचे व रहिवासी असल्याचे खोटे व बनावट पुरावे तयार करणाऱ्या खेळाडूंवर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तसेच असा खेळाडू ज्या संघात खेळत असेल त्या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल व त्या संघाला रु. १० हजार दंड म्हणून द्यावा लागेल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व अकॅडमी व क्लबच्या संघांना आवाहन केले आहे की, खोटे वयाचे व रहिवाशी असल्याचे दाखले तयार करून आपल्या संघाची प्रतिष्ठा व खेळाडूंचे क्रिकेट करिअर याला डाग लागून देऊ नये असे कोणी सापडल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरडीसीए तर्फे देण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!