“सुरश्री या कार्यक्रमामधून होणार सुरांची उधळण
विनायक पाटील
पेण : समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि प्रामुख्याने कोकणातील तरुणांनी मुंबई येथे स्थाईक होऊन मागील २५ वर्षांपूर्वी “कोकण कट्टा” या सेवाभावी संस्थेचे बिज रोवले होते. आज २५ वर्षात या रोपाच रूपांतर वटवृक्षात झाले आहे. ही संस्था गेली २५ वर्षे मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि कोकण या भागात विविध प्रकारे समाजिक चळवळ राबवून गरीब, दुर्बल आणि अनाथ घटकांना मदतीचा हात देत असते.
“कोकण कट्टाच्या” रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्त साधत “कोकण सन्मान” सोहळ्याचे आयोजन आज १९ डिसेंबर रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे रात्री ८ वाजल्यापासून करण्यात आले आहे. या वेळी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या आणि कोकण कट्टाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या नामवंतांचा सन्मान सोहळा या वेळी होणार आहे. तसेच अनिल देसाई यांच्या वतीने प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि श्रीकांत नारायण यांच्यासह २० नामवंत गायकांच्या सुरेल आवाजातील हिंदी, मराठी गीतांचा “सुरश्री” सोहळाही रंगणार आहे, अशी माहिती कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांनी दिली.
कोकण सन्मान सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात मास्टर्स क्लासेसचे गौरव सावे, उद्योजक अथर्व ग्रुपचे सचिन गुंजाळ, आरोग्यसाठी दंतचिकित्सक डॉ. रोहित कर्णिक, कलाकार प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक, पत्रकार अरविंद गुरव, सामाजिक क्षेत्रासाठी करुणेश्वर वृद्धाश्रमाचे इश्वर ढोरे, सेवाभावी देवदूत कल्पेश ठाकूर, पेण यांचा गौरव होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर उपस्थित राहणार आहेत.