सलीम शेख
माणगाव : मागासवर्गीय समाजाचे असल्याचे माहित असतानाही जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात अँट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. ३१ जानेवारी २०२४ ते दि. १० मे २०२४ दरम्यान माणगाव तालुक्यातील हिरालाल महादेव मेथा हायस्कुल विळे येथे घडली. याबाबतची फिर्याद परशुराम हरिश्चंद्र आंबेतकर (वय – ५१, रा. रोहिदासनगर विळे ता. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी उशिरा दिल्याने यांतील आरोपींवर अँट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेची खबर देणारे परशुराम हरिश्चंद्र आंबेतकर हे मागासवर्गीय हिंदु चांभार समाजाचे असल्याचे माहित असुन देखील आरोपी हिराबाई महादेव मेथा हायस्कुलचे मुख्याध्यापक राजेंद्र अमरनाथ ठाकूर, संस्थापक सुभाष हिरालाल मेथा, हायस्कुलचे सदस्य महादेव ताम्हणकर, हायस्कुलचे सदस्य तानाजी भोकर, विद्या नलावडे (सर्व रा. विळा) यांनी जातीवाचक शिवीगाळी केली व आरोपी राजेंद्र ठाकूर यांनी खबर देणार यांची पत्नी हिला हाताने धक्का देऊन खाली पाडले व हातात दगड घेवुन ठार मारीन अशी धमकी दिली. त्यावेळी खबर देणार यांस बीपीचा त्रास होवु लागल्याने ते शाळेत पाणी पिण्यास गेले असता आरोपी राजेंद्र ठाकूर व तानाजी भोकर यांनी खबर देणारे हे मागासवर्गीय आहेत हे माहीत असताना देखील त्यांना शाळेचे पाणी पिण्यास विरोध केला. तसेच आरोपी विद्या नलावडे यांनी खबर देणाऱ्यास झोडपते अशी धमकी दिली. या गुन्ह्या प्रकरणी वरील पाच आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं. ३००/२०२४ भादवी संहिता कलम ३५४,३२३,५०४,५०६,३४ अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधि कलम ३ (१),(आर),(एस),३ (१) (डब्लू ),(१),(१),३ (२),५ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी करीत आहेत.