घनःश्याम कडू
उरण : डोंगराळ भागात स्वतंत्र्य पूर्व काळापासून वाड्या वास्तव्य करून आहेत. परंतु आता वाड्यांवर दरड कोसळण्याच्या घटना घडून अनेकांचा बळी जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. नुकतीच खालापूर येथील इर्शालवाडीवर दरड कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. तरी अशा घटनांची पुरावृत्ती होऊ नये या हेतूने उरणमधील डोंगराळ भागात वाड्यांची तपासणी करून धोका वाड्यातील वस्तीचे स्थलांतर करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
स्वातंत्र्य काळापासून डोंगर कपारीत अगदी लगद वाड्या वास्तव्य करून आहेत. यामध्ये अनेक जातीधर्माच्या लोकांचा समावेश आहे. यातील काही वाड्यांवर स्वतंत्र मिळून 75 उलटूनही मूलभूत सुविधा मिळालेल्या दिसत नाही. एखाद्या व्यक्तीला दवाखान्यात न्याव्याचा असेल तरी डोली बनवून न्यावे लागत आहे. रस्ता सोडा साधी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे काही ठिकाणी दिसते. मात्र निवडणुकीत मतांसाठी त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवली जातात. अशा अनेक निवडणुका होऊनही परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र पहावयास मिळते.
गेली अनेक वर्षे वास्तव्य करून असलेल्या वाड्यांच्या बाजूला असलेला डोंगर ऊन वारा पाऊस याचा सामना करीत उभा असतो. त्याचा परिणाम होऊन
अचानकपणे दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसते. माळीण, तळीये त्यानंतर दोन तीन दिवसांपूर्वी खालापूर येथील इर्शालवाडीवर दरड कोसळून कित्येकजण गाडले आहेत. त्यातील 27 जणांचे मृतदेह सापडले. तर इतरांना शासनाने मयत घोषित केले आहे. त्यांना शासनाकडून मदत मिळेल हे जरी खरे असले तरी अशा घटना या नेहमीच घडत राहणार आहेत.
शासनाने अशा दुर्घटना टाळण्यासाठी उरण तालुक्यातील डोंगराळ भागातील वाड्यांची तपासणी करून अतिधोकादायक असलेल्या वाड्यांचे त्वरित स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.