वर्ष येतात व जातात पण त्या वर्षात घडलेल्या चांगल्या वाईट घटना ऐतिहासिक ठेवा म्हणून कायम स्मरणात राहतात. या २०२४ वर्षाचा मागोवा घेतला तर अशा अनेक घटना दृष्टिपटलावर दिसतील. आपण या वर्षात पितृतुल्य, आपल्या मायभूमीवर प्रेम करणारे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त रतनजी टाटा व अगदी वर्षाला निरोप देण्यासाठी काही दिवस असतांना आपला निरोप घेतलेले थोर अर्थतज्ञ, भारताचे पंतप्रधान, भारतरत्न डॉ. मनमोहन सिंग. या दोन्ही माहात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. या २०२४ वर्षाचे स्वागत अत्यंत क्रूर हल्ल्याने झाले. २ जानेवारीच्या रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्येच खुलेआम गोळीबार करण्यात आला व नवीन वर्षाला रक्तरंजित गालबोट लागले. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या समोरच ही घटना घडली. या प्रकरणामुळे दोन राजकीय पक्ष एकमेकांवर भिडले. पण सरकार त्यांचेच होते म्हणून जास्त गाजावाजा झाला नाही.
२० ऑगस्ट २०२४ माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य केलं. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये पाहण्यास मिळाला. या मनःस्तापातून कर्मचारी सावरता-सावरता पोलिस गोळीबारात मारला गेला. त्याच्या या चुकीची शिक्षा आई-वडील भोगत आहेत. त्यांच्या म्हातारपणाचा आधार राहिलेला नाही. ही घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली. या शाळेतील पी. टी. शिक्षकाने शाळेतील ७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले. या प्रकरणातही नराधम शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे.
राजकारणाचा विचार केला तर, मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजपला) काठावर बहुमत मिळाले व ते शांत झाले. ४०० पारचा नारा काही अंशी थोपवून ठेवण्याची किमया मतदारराजाने करून दाखवली. महाराष्ट्रातील चित्रं बघितले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घेतलेला निर्णय लोकांसाठी चर्चेचा विषय होता. लोकसभेत ते भाजपचा प्रचार करताना दिसले, तर विधानसभा निवडणुकीत ते स्वतंत्र लढले. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला आलेले अपयश कदाचित या मागे असू शकते. पण या उलट विधानसभेचे निकाल लागले व मनसेच्या पदरी अपयश आले. या ठिकाणी मनसेची भुमिका लवचिक असती तर कदाचित मनसे सत्तेत असते. काका-पुतण्यातील वाद वाढले तर काही ठिकाणी बहिण-भावातील दुरावा दूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बाबा वेंगा, या एक बल्गेरियन गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी २०२४ वर्षाबाबत ज्या काही भविष्यवाणी केल्या होत्या, त्यातील तीन भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं की, २०२४ मध्ये जागतिक आर्थिक संकट, वातावरणीय बदलांमुळे निर्माण झालेल्या संकटाचा जगाला सामना करावा लागेल. तसेच यावर्षी एखाद्या दुर्धर रोगावर मोठं संशोधन होऊ शकतं. बाबा वेंगा यांच्या या तीन भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो. दरम्यान, एखाद्या दुर्धर आजारावर संशोधन करण्यात यश येईल अशी तिसरी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली होती, ती देखील खरी ठरताना दिसत आहे. गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसंदर्भातील औषध संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना मोठं यश प्राप्त झालं आहे. यामध्ये काही अंधश्रद्धा ही असू शकते. पण जेथे लोक जास्त विश्वास ठेवतात तेथे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते.
माझ्यासाठी, कुटुंबियांनासाठी हे वर्ष चांगलेच गेले असे म्हणता येईल. मी या वर्षात तीन पुस्तके प्रकाशित केली. दोन रसायनशास्त्राची व एक माझे वेगवेगळ्या दैनिकांत व नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रासंगिक व मुद्दामहून लिहिलेल्या लेखांचे “माझ्या लेखणीतून” हे पुस्तक प्रसिद्ध केले. या वर्षी प्रज्वल पदवीधर झाला. तसेच गेटची परीक्षा उत्तीर्ण झाला. माझे आणि मिनाक्षीचे स्वास्थ्य पन्नाशीत उत्तम राहिले आहे. चैत्राली या वर्षात तीची फायनलची परीक्षा देत आहे. बऱ्याच बाबी उल्लेख करण्यासारख्या आहेत. पण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्याला सज्ज राहिले पाहिजे. सर्वांना नुतन वर्ष २०२५ च्या शुभेच्छा. आपण ठरविलेले प्रत्येक संकल्प पूर्ण होवो ही कामना. Happy New Year 2024

प्राध्यापक
आ. प्र. वि. महाविद्यालय, नागोठणे
8412991873