• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यामध्ये कुरघोडीचा नवा अंक? एकनाथ शिंदेंनी टाकला डाव…

ByEditor

Feb 18, 2025

मुंबई : प्रचंड बहुमताने महायुती राज्याच्या सत्तेवर आली असली तरी अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकांना एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वॉर रुमवरून वॉर सुरू असताना दुसरीकडे आता, एकनाथ शिंदे यांनी आणखी एक डाव खेळला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष असतानादेखील आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सुरू केला आहे. विशेष म्हणजे हा कक्ष मंत्रालयातच असणार आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मु्ख्यमंत्री सहाय्यता विभागाच्यावतीने रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात येत होती. वैद्यकीय उपचारांसाठी मोठी मदत हजारो गरजूंना देण्यात आली. त्यावेळी मंगेश चिवटे हे त्याचे प्रमुख होते. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंगेश चिवटे यांना दूर सारत आपल्या प्रतिनिधीची नियुक्ती केली.

आता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा’चे प्रमुख मंगेश चिवटे यांना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष’ मुख्यमंत्री सहाय्यता विभागाशी संबंधित नसणार. हा विभाग थेट आरोग्य खात्याशी संबंधित असणार आहे. शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे आरोग्य मंत्री आहेत.

एकनाथ शिंदे यांचा वैद्यकीय मदत कक्ष आरोग्य विभागाच्या विविध योजनांतर्गत लोकांना मदत करणार आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री मदत निधीप्रमाणे थेट आर्थिक मदत देणार नाही. तर, गरजूंना उपचारासाठी मार्गदर्शन करणे, धर्मादाय रुग्णालयांची माहिती देणे, आदी कामे करणार आहे. मंगेश चिवटे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्य सरकारची योजना असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास मदत करणार आहे. तर, हा कक्ष रुग्णांना थेट आर्थिक मदत पुरवणार नाही, तर मुख्यमंत्री सहाय्यता विभाग तसेच धर्मादाय रुग्णालय, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आणि केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे ही मदत कशी मिळवता येईल याबद्दल लोकांना मार्गदर्शन करणार असल्याचे चिवटे यांनी स्पष्ट केले. आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळतील याची खात्री करण्यासाठी हा कक्ष एक दुवा म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांची ही कृती थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आव्हान असल्याचे म्हटले जात आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे कायदा आणि न्याय विभाग होता. त्यावेळी हा विभाग खाजगी धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना मदत करायचा.

फडणवीस-शिंदे यांच्यात दुरावा?

याआधीही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही मुद्यांवरुन नाराजी असल्याची चर्चा होती. परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी थेट परिवहन खात्याच्या सचिवांना एसटी महामंडळाचा अध्यक्ष केले. त्याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे काही निर्णय फडणवीस यांच्या रडारवर असल्याचे म्हटले जात आहे. भाडेतत्वावर एसटी बस घेण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे. तर, पालक मंत्री पदावरूनही शिंदे नाराज आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!