• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एचआर फिटनेस पुरस्कृत अनिकेत ११ पेण कोळीवाडा संघ ठरला ‘अलिशान कप २०२५’चा मानकरी

ByEditor

Feb 18, 2025

अब्दुल सोगावकर
सोगांव :
अलिबाग तालुक्यातील सोगांव येथे अलिशान सोगाव मंडळाने ‘अलिशान कप २०२५’ पर्व १२वे मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म टेनिसबॉल रात्रीच्या प्रकाशझोतातील भव्य क्रिकेट स्पर्धा शुक्रवार, दि. १४ व शनिवार, दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी असे दोन रात्री आयोजित करण्यात आल्या होत्या. नेत्रदीपक व भव्यदिव्य असे आयोजन करत असलेल्या अलिशान सोगाव मंडळाचे सर्व स्तरातून नेहमीच कौतुक केले जाते. या अलिशान सोगाव मंडळाने आयोजित केलेल्या अलिशान कप २०२५ च्या क्रिकेट स्पर्धेत एच. आर. फिटनेस पुरस्कृत अनिकेत ११ संघ पेण कोळीवाडा या संघाने दमदार कामगिरी केल्यामुळे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. याबद्दल संघावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

या भव्यदिव्य आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे चिटणीस ॲड. प्रविण ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेस अध्यक्ष मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाख शिलोत्री, माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर, एसओएस चिल्ड्रेन व्हिलेजचे डायरेक्टर सुजय बाजपेयी, सोगाव जमातुल मुस्लिमीन सोगाव अध्यक्ष मुरतुजा कुर, सोगाव येथील ज्येष्ठ नागरिक कुतुबुद्दीन कप्तान, मापगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच समद कुर, आगरसुरे ग्रामपंचायत माजी सरपंच जगन्नाथ पेढवी, सातीर्जे ग्रामपंचायत माजी उपसरपंच उमेश ठाकूर, मापगाव ग्रामपंचायत माजी सरपंच उनीता थळे, मदिना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मन्सूर कुर, जमातुल मुस्लिमीन सोगाव उपाध्यक्ष नजीर कुर, रुस्तुम कुर, माजी सदस्या सानिका घाडी, सीताराम कवळे, अनिल जाधव, मैनुद्दीन अन्सारी, जलील पठाण, हशमत कुर, हानिफ कुर, नवाज आराई, इम्तियाज कुर आदी मान्यवर व सोगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी अलिशान सोगाव मंडळाचे क्रिकेट स्पर्धेचे अतिशय सुंदर आयोजन व नियोजन केल्याबद्दल भरभरून कौतुक केले व अलिशान मंडळाला व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये गाव ते गाव असे १६ संघ होते तर आयपीएल ८ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.

दुसऱ्या दिवशी खेळाडूंना व आयोजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सातीर्जे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आमिर उर्फ पिंट्या ठाकूर, समीर ठाकूर, रवी नाना ठाकूर, अखलाख वाकनिस, उद्योजक जितू बेर्डे, जया ढोले, मुळे ग्रामपंचायत उपसरपंच प्रसाद थळे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीही क्रिकेट प्रेमींनी स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सातीर्जे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर यांनी अलिशान मंडळाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत अंतिम लढत एच. आर. फिटनेस पुरस्कृत अनिकेत ११ संघ पेण कोळीवाडा व अल- अजीज संघ अलिबाग यांच्या मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत एच. आर. फिटनेस पुरस्कृत अनिकेत ११ संघ पेण कोळीवाडा संघाने दमदार कामगिरी करून बाजी मारत प्रथम क्रमांक १,५०,००० रुपये पारितोषिक व आकर्षक चषक पटकावला तर अल-अजीज अलिबाग संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले व त्यांनी ८०,००० रुपये पारितोषिक व चषक पटकावले, तसेच तृतीय क्रमांक जय हनुमान बागदांडा संघाने ४०,००० रुपये पारितोषिक व चषक पटकावला.

या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजचा मान अल-अजीज अलिबाग संघाचा उत्कृष्ट खेळाडू पंकज जाधव याने पटकावला, तर उत्कृष्ट गोलंदाजचा मान जय हनुमान बागदांडा संघाचा भरत पाटील याने पटकावला, तसेच स्पर्धेतील मालिकावीर म्हणून एच. आर. फिटनेस पुरस्कृत अनिकेत ११ पेण कोळीवाडा संघाचा प्रसाद पाटील याला गौरविण्यात आले.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, सातीर्जे माजी उपसरपंच उमेश ठाकूर, बहिरोळे पोलिस पाटील प्रफुल्ल थळे, कुतुबुद्दीन कप्तान यांच्याहस्ते व युवा नेता सुचित थळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, अलिशान सोगाव मंडळाचे अध्यक्ष लाईक कप्तान व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला, यावेळी सर्व विजेत्या संघांना व खेळात उत्कृष्ट कर्तब दाखवणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना अलिशान सोगाव मंडळातर्फे रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी अलिशान सोगाव मंडळाचे सर्व सदस्य, सोगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. अलिशान सोगाव मंडळाने या स्पर्धेसाठी उत्कृष्ट आयोजन व नियोजन केले होते, त्याबद्दल सर्वच क्रिकेट संघांनी व उपस्थित मान्यवरांनी तसेच स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेटप्रेमींनी अलिशान सोगाव क्रिकेट मंडळाचे विशेष आभार मानले.

या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या संघांना क्रीडाप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी आपल्या स्वखर्चाने आकर्षक चषक भेट दिली. या स्पर्धेत सतत दोन रात्री काका म्हात्रे सर यांनी स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन केले, तर स्पर्धेत दोन दिवस समालोचन विकास साखरकर, यश मापगावकर, निखिल पडते, इमरान बुखारी, मुस्ताक अपरात, सुहास फाटक यांनी उत्तमरीत्या करत उपस्थित सर्व मान्यवरांची व क्रिकेटप्रेमींची तसेच थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या दर्शकांची मने जिंकली. स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तसेच स्पर्धा पाहण्यासाठी ज्यांना येणे शक्य झाले नाही, त्यांना घर बसल्या पाहता याव्यात यासाठी युट्यूब वर थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यासाठी व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अलिशान सोगाव मंडळाचे अध्यक्ष लाईक कप्तान यांच्या मार्गदर्शनाखाली अलिशान सोगांव मंडळाचे सर्व सदस्य तसेच सोगाव ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!