क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने एप्रिल महिन्यात आरडीसीए टी -२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात टेनिस बॉल क्रिकेटचे सर्वत्र साम्राज्य पसरले असतांना लेदर बॉल क्रिकेट ज्यातून खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी संधी मिळते त्या लेदरबॉल क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी आरडीसीए जोमाने काम करत आहे. रायगड जिल्ह्यातील युवा, गुणवान व उद्योन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर आपली गुणवत्ता दाखवून देण्याची संधी मिळावी आणि त्यामूळे त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर ओळख व प्रसिध्दी मिळावी हाच या स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश आहे. आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला चांगले खेळाडू मिळावे व आयोजित केलेल्या स्पर्धेतून जिल्हा क्रिकेट असोसिएशनला जिल्ह्यात क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतूद सुद्धा पूर्ण करता येईल अशी अपेक्षा आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि आयपीएल स्पर्धेच्या वैभवशाली धर्तीवर पुरुषांच्या आरडीसीए टी -20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले. ह्या स्पर्धेत जिल्ह्यातील ८ संघाचा समावेश असणार आहे. विविध संघांचे मालक खेळाडूंचा लिलाव पद्धतीच्या माध्यमातून संघ खरेदी करतील. अत्यंत पारदर्शक अशा प्रक्रियेतून खेळाडू व संघांची निवड होईल. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना ४ श्रेणीत आपली नोंदणी ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे दि. ५ मार्चपर्यंत करायची आहे. खुला गट, तेवीस वर्षाखालील, एकोणीस वर्षाखालील व सोळा वर्षाखालील मुलांच्या गटात खेळाडूंचा समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक संघात आयकॉन खेळाडूसह १८ खेळाडू असतील. प्रत्येक श्रेणीतील खेळाडूंना संघात स्थान देण्यात येणार आहे. त्यामध्ये आयकॉन १, खुला गटातील जास्तीतजास्त ७, तेवीस वर्षाखालील गटातील ४, एकोणीस वर्षाखालील गटातील ४ व सोळा वर्षाखालील गटातील २ खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक संघाला ७ लीग मॅचेस खेळण्यास मिळतील. स्पर्धेसाठी खेळाडूंचं ऑक्शन मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एका रंगारंग कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.
संपूर्ण स्पर्धा ही यूट्यूबच्या माध्यमातून लाइव्ह प्रदर्शित करण्यात येणार आहे. तरी रायगड जिल्ह्यातील जास्तीजास्त खेळाडूंनी आपला सहभाग हा स्पर्धेसाठी नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ह्या स्पर्धेच्या प्रक्रियेत सहभागी होऊन जिल्ह्यातील क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी रायगड जिल्ह्यातील कॉर्पोरेट, औद्योगिक, व्यावसायिक संस्थांनी पुढे येऊन प्रायोजकत्व देऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.