• Sun. Apr 6th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत -सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

ByEditor

Feb 21, 2025

पळस्पे ते कशेडी घाट रस्त्याची केली पाहणी

रायगड : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. महामार्गावरील प्रत्यक्ष सुरु असलेली कामे, त्यामध्ये होत असलेली दिरंगाई,जमीन हस्तांतरणात येत असलेल्या अडचणी तसेच अन्य सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. तरी सर्व संबंधित यंत्रणानी महामार्गचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. पनवेल येथील पळस्पे फाटा येथून या पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली. हा महामार्ग एकूण १२ टप्प्यांत विकसित होत आहे.एकूण ४३९.८८ किमीपैकी पळस्पे फाटा (पनवेल) ते हातखांबा (रत्नागिरी) या 281 किलोमीटरच्या पल्यावरील कामाची पाहणी करणार आहेत..सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाच्या अधिका-यांकडून त्यांनी या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, त्यासाठी आवश्यक बाबी यांची त्यांनी माहिती घेतली. ही कामे लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील अधिका-यांनी परस्पर समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करावेत अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी यावेळी दिल्या.

या पाहणी दौऱ्यात मंत्री श्री भोसले यांनी पलस्पे फाटा, पेण, वाशीनाका,गडब,आमटेम,नागोठणे, कोलाड,इंदापूर, माणगाव,लोणारे रोड या विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपारी सहाय्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, सा. बां. (एनएच) मुख्य अभियंता श्री. शेलार, मुख्यव्यवस्थापक अंशुमानी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक यशवंत घोटकर, अधीक्षक अभियंता रा. म. तृप्ती नाग, सा. बां. अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री. सुखदेवे, श्री. नामदे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, महामार्गावर ज्या ठिकाणी पुलांची कामे चालू आहेत त्याठिकाणी सर्व्हिस रोड नीटनीटके व वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवावेत. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी व पुढे गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होणार नाही. इंदापूर व माणगाव बायपास पुलाच्या निविदा प्रक्रियेची कार्यवाही फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल. मार्च महिन्यात काम चालू होईल. महामार्गचे काम करतांना ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा उत्कृष्ट राहील याची विभागाने तपासणी करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तरी संबंधित सर्व यंत्रणानी दर्जेदार व विहित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. परस्पर समन्वय साधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याबैठकीत उड्डाणपूल, सर्विस रोड, गटारे, पावसाळ्यात तुंबणारे पाणी, वाहतूक कोंडी, पथदिवे यांसह विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!