घनःश्याम कडू
उरण : राज्य शासनाने 19 फेब्रुवारी रोजी अधिकृत शिवजयंती साजरी करण्याचे निर्देश दिले असताना, मत्स्य विभागाच्या मुंबई कार्यालयात मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. यावेळी मीच छत्रपती! असा वादग्रस्त दावा सहआयुक्त महेश देवरे यांनी केला आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत मत्स्यविभागाचे मंत्री नितेश राणे यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी चौकशीची मागणी केली असल्याचे समजते.
सहआयुक्तांचा वादग्रस्त दावा-मीच छत्रपती!
या संदर्भात सहआयुक्त (सागरी) महेश देवरे यांच्याकडे पत्रकारांनी व्हॉट्सअॅपद्वारे विचारणा केली असता, त्यांनी असे उत्तर दिले की, आहो, आमचे महाराज आहेत. आम्ही त्यांना दररोज अभिवादन करतो, जयंतीनिमित्त नाही. यासोबतच, मीच छत्रपती असल्याचा विवादित दावा करून त्यांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या.
महाराजांचा अवमान, सखोल चौकशीची मागणी
या संपूर्ण घटनेबाबत शिवप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला असून, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शिवजयंतीपेक्षा अधिकार्यांसाठी सुट्टी महत्त्वाची का? शासनाच्या आदेशाला डावलून 18 तारखेलाच जयंती साजरी करण्याची गरज का भासली?, मीच छत्रपती असे वक्तव्य करणार्या अधिकार्यावर कारवाई होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावी म्हणून शिवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मत्स्य विभागाच्या मंत्र्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय प्रदेश फिशरमन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी घेतला आहे. शासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.