मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदींच्या भाषणावर टीका करताना त्यांना शिवसेनेनं खासदार का केलं, याचं कारण सांगितलं. विशेष म्हणजे यावेळी, त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा दाखल देत, हे विधान केलं होतं. त्यानंतर, आदित्य ठाकरेंनी गद्दार म्हणत प्रतिक्रियाही दिली. तर, प्रियंका चतुर्वेदींनीही शिरसाटांना ट्विटरवरुन चांगलच झापलं होतं. आता, प्रियंका यांची पाठराखण करत मनसेनं शिरसाटांसह भाजपलाही सुनावलं आहे. महाशक्तीने मुकुट चढविलेलं हे ‘शिर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे, अशा शब्दात मनसेनं शिरसाटांवर जोरदार प्रहार केला.
शिवसेनेतील फुटीर गटाला गद्दार म्हटलं होतं. त्यावरुन, शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वैदींवर निशाणा साधला. त्यांचं सौंदर्य पाहून त्यांना खासदार केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. शिरसाट यांच्या विधानावर आदित्य ठाकरेंनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. यावरुन आता, मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शिरसाटांना चांगलंच सुनावलं आहे. तसेच, हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही दिलाय.
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “महिलांबद्दलचा जितका आदर मनात साठवीत जाल तितके शिवराय तुमच्यावर अधिक प्रसन्न होत जातील…” त्याच प्रबोधनकार ठाकरेंच्या सुपुत्राचे म्हणजेच स्व. बाळासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करायचं आणि महाशक्ती पाठीशी आहे म्हणून महिलांबद्दलची वाट्टेल ती विधानं करायची हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही… अशांचं ‘शीर’ नेत्यांनी जाग्यावर आणावे अन्यथा ते ‘शीर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे असं महाराष्ट्रात प्रचलित होईल, असे ट्विट मनसेनं केलं आहे.