मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने समुद्रात उडी मारली असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन केलं जात आहे. मुंबई पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड एकत्रितपणे त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती कारने वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन जात होती. सी–लिंकच्या मधोमध पोहोचल्यानंतर त्याने कार थांबवली आणि थेट समुद्रात उडी मारली. वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळताच कोस्ट गार्ड यांच्यासह मुंबई पोलीस आणि नौदलाने सर्च ऑपरेशन सुरु केलं. सर्च ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरचाही वापर केला जात आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवरुन याआधीही अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने सरकारकडून उत्तर मागितलं होतं. ज्यानंतर सी-लिंकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवत सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.