पुणे : श्री एकविरा देवी चैत्र उत्सव २०२५ पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी ३० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशान्वये वरील कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके, वाद्ये, ढोल, ताशे, वाजविण्यास व गडावर नेण्यास बंदी करण्यात येत आहे. एकाच प्रकारची व रंगाची कपडे, वेशभूषा परिधान करणे, विशेषत: टी शर्ट वापरणे, कोंबडे, बकरे, पशु, पक्षी यांचा बळी देणे व त्यांना मंदिरावर सोडणे, कार्ला लेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तु व शिल्पांना हानी पोहचविणे अथवा विद्रुपीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ मधील तरतुदी व प्रचलित कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, लोणावळ्यातील एकविरा गडावर हिंदू नववर्षाच्या शुभ महूर्तावर आई एकविरा देवीच्या मुख्य मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. आजपासून कार्ला एकविरा गडावर चैत्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. चैत्र नवरात्री चा आजचा पहिला दिवस असल्याने भाविकांची मांदियाळी देखील कार्ला एकविरा गडावर दिसून येत आहे.